पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानुसार विद्यापीठाचे एकूण अपेक्षित उत्पन्न ६१९ कोटी रुपये असून, ६२४ कोटी रुपये खर्चासह विद्यापीठ निधीतून कल्याणकारी आणि अन्य निधीसाठी ७८ कोटी रुपये असा एकूण ७०२ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. काही नव्या योजना मांडण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव चारुशीला गायके आदी या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षीही विद्यापीठाने ८२ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करून अधिसभा सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
डॉ. घोरपडे म्हणाले, ‘विद्यापीठाचे कामकाज अद्ययावत आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा नव्याने विकासकामे सुरू न करता पूर्वीची कामे पूर्ण करण्यावरच भर देण्यात आला आहे. बांधकामांमध्ये नियमितता, गतिमानता, कालबद्धता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठ आवारातील इमारतींच्या बांधकामासाठी ४९ कोटी ५५ लाख रुपये, इतर सुविधा-सुधारणांसाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.’
विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांपैकी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेसाठी १ कोटी २५ लाख, महात्मा जोतिराव फुले अर्थसाहाय्य योजनेसाठी २ कोटी ३० लाख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थसाहाय्य योजनेसाठी २ कोटी ३० लाख, स्वामी विवेकानंद अर्थसाहाय्य योजनेसाठी २ कोटी २५ लाख, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाहाय्य योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज अर्थसाहाय्य योजनेसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थी विकास मंडळासाठी १३ कोटी ९२ लाख, समर्थ भारत अभियानासाठी ५० लाख, विद्यार्थी सुरक्षा विमा योजना आणि आपत्कालीन साहाय्यासाठी ४० लाख, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य योजनांसाठी १ कोटी ६० लाख, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विमा योजनेसाठी ८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती डॉ. घोरपडे यांनी दिली.
नव्या योजनांसाठीच्या तरतुदी (रुपयांत)
- संशोधन संवर्धन योजना : २ कोटी
- आशियाई देशांतील तज्ज्ञ प्राध्यापकांचा अध्यापन आदान-प्रदान उपक्रम : ५ लाख
- प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस : ५२ लाख
- आंतरराष्ट्रीय अतिथी प्राध्यापक : ५० लाख
- दर्जेदार संशोधनपत्रिकांची ज्ञानसूची : ३१ लाख २० हजार
- भारतीय भाषांतील संशोधन पत्रिकांचा विदासाठा : ३१ लाख २० हजार
- विद्यापीठ विभाग क्रमवारी आराखडा : १ कोटी ५० लाख
- महाविद्यालय मार्गदर्शनासाठी परिसस्पर्श योजना : ५० लाख
- नवउद्योजक विकास उपक्रम : १२ लाख
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे : ९२ लाख
- माहिती तंत्रज्ञान सुविधा : १ कोटी
- सीसीटीव्ही प्रणाली : १० कोटी
अर्थसंकल्पामध्ये प्रथमच निधी आधारित पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ८३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. – चारुशीला गायके, वित्त व लेखा अधिकारी आणि प्रभारी कुलसचिव.
