पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवासस्थानांच्या आवारातील परदेशी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शुक्रवारी रात्री एका डिलिव्हरी बॉयने प्रवेश करून विद्यार्थिनींसमोर अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी अधिसभेत उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे संबंधित विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना सांगितले. ‘या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने संबंधित वसतिगृहात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासह सखोल चौकशी करून दोषींवर दोन दिवसांत कारवाई करण्यात येईल,’ असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यात ४५ आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी आणि ८५ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी यांची निवासाची सोय आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेशी (आयसीसीआर) झालेल्या सामंजस्य करारानुसार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाल्यानंतरच प्रवेश देण्यात येतो. काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनींच्या निवासाची सोय विद्यापीठात पाहुणे म्हणून येणाऱ्या प्राध्यापकांच्या इमारतीत करण्यात आली आहे. या इमारतीत सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक अशा कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याचे अधिसभेत स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त सदस्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र शब्दांत टीका केली.

घडलेल्या प्रकरणाची माहिती विद्यार्थिनींनी कुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्यांना दिली. ‘शुक्रवारी रात्री मागवलेली वस्तू घेऊन देण्यासाठी डिलिव्हरी बॉय खोलीजवळ आला. त्या वेळी त्याने अश्लील वर्तन केले. याबाबत तातडीने विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांना आणि संबंधितांना माहिती दिली. त्या वेळी विद्यापीठाचे सुरक्षारक्षक झालेल्या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी आम्हाला पोलीस चौकीत घेऊन गेले. मात्र, अन्य अधिकाऱ्यांनी आम्ही ही तक्रार देऊ नये म्हणून दबाव टाकून त्याबाबत लिहून घेतले,’ असा दावा विद्यार्थिनींनी केला.

विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉ. गोसावी यांनी, ‘याप्रकरणी चौकशी समिती नेमून चौकशी दरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. या प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

परदेशी विद्यार्थिनींचे वास्तव्य असलेल्या वसतिगृहाच्या आवारात सुरक्षेसाठी २४ तास महिला सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. त्या वसतिगृहाला संरक्षक कुंपण लावण्यात येईल. विद्यार्थिनींना असुरक्षित वाटल्यास त्यांची अन्य वसतिगृहात व्यवस्था करण्यात येईल. समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.