पुणे : बदलत्या काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पावले टाकण्यात येत आहेत. त्यात उत्तरपत्रिकांचे डिजिटलायझेशन आणि ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचा विद्यापीठाचा मानस असून, प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या सत्रात अधिसभा सदस्य ॲड. ईशानी जोशी यांनी परीक्षांतील उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाला वेळ लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे मान्य करून, त्याबाबत स्पष्टीकरण दिले. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलसचिव चारुशीला गायके या वेळी उपस्थित होते.

‘उत्तरपत्रिकांची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया आता कठीण झाली आहे. महाविद्यालये स्वायत्त होत असल्याने पुनर्मूल्यांकनासाठी शिक्षक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मनुष्यबळाची मर्यादा लक्षात घेऊन आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. त्यात परीक्षेनंतर उत्तरपत्रिका स्कॅन करून क्लाउडवर ठेवल्या जातील. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची मागणी केल्यास उत्तरपत्रिका सहजपणे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य होईल.

तसेच, उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन वेगाने करता येईल. त्याशिवाय ऑनस्क्रीन मूल्यांकनाचे नियोजन करण्यात येत आहे. त्याबाबत प्राथमिक बैठका झाल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर विभाग, विद्याशाखा अशा स्वरूपात ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचा प्रयत्न आहे,’ असे डॉ. काळकर यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनीही तीन वर्षांपूर्वी ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. ती प्रत्यक्षात येण्याची प्रतीक्षा आहे.

अधिसभा सदस्य डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ देऊन विद्यापीठाने ‘ॲक्सेसॅबिलिटी ऑडिट’बाबत (सुगमता लेखापरीक्षण) प्रश्न उपस्थित केला. मात्र, स्वतंत्रपणे लेखापरीक्षण करण्यात आले नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. ‘केवळ विद्यापीठाचे संकेतस्थळ नाही, सर्व अध्ययन स्रोत दिव्यांगांसाठी सुगम असणे आवश्यक आहे. विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयांत दिव्यांग किती, याची आकडेवारी उपलब्ध नाही,’ असे सांगून डॉ. लळिंगकर यांनी नाराजी व्यक्त केली.

या संदर्भात डॉ. काळकर म्हणाले, ‘विद्यापीठाच्या संकेतस्थळाची १७ फेब्रुवारी २०२३ला तपासणी करण्यात आली. त्यातील सूचनांनुसार विद्यापीठाचे नवे संकेतस्थळ तयार केले आहे. ते दिव्यांगांसह सर्व घटकांना वापरण्यासाठी सुलभ असेल, याची पडताळणी करण्यात येत आहे. तसेच, महाविद्यालयांसाठी आवश्यक अन्य सॉफ्टवेअरही या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.’

कुलगुरूंवर आरोप

अधिसभेत शनिवारीही वादाचे प्रसंग घडले. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी हे बदनामी करत असल्याचा, दबाव तंत्राचा वापर करून गप्प करत असल्याचा आरोप करून व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी सभात्याग केला. दिवसभर ते सभागृहाबाहेर बसून राहिले. या प्रकाराबाबत त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली. तसेच, विचारलेल्या प्रश्नांना योग्य पद्धतीने उत्तरे दिली जात नसल्याबाबत अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार कुलगुरूंनी दिलगिरी व्यक्त केली.