पुणे : अभिजात संगीताच्या क्षेत्रात जगभरात नावाजलेला  सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता मुकुंदनगर येथील कटारिया प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने फेब्रुवारीमधील तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या वेळी राज्य सरकारची जी नियमावली असेल तिचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली.  दरवर्षी डिसेंबरमधील दुसऱ्या सप्ताहातील बुधवार ते रविवार हे पाच दिवस संगीतप्रेमी रसिक सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी राखून ठेवतात. मात्र डिसेंबरनंतर महोत्सवाचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. १९६९ मध्ये पानशेत पुरामुळे त्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सव जाहीररित्या होऊ शकला नव्हता. मात्र नानासाहेब देशपांडे यांच्या घरी हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. फिरोज दस्तूर यांनी गायनाने सवाई गंधर्व यांना अभिवादन केले होते, तर २००९ आणि २०१४ या वर्षी डिसेंबरमध्ये रद्द करण्यात आलेला महोत्सव जानेवारीमध्ये आयोजित केला होता. करोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षी आयोजन करणे शक्य झाले नाही. या वर्षीही खुल्या मैदानातील कार्यक्रमांसाठी २५ टक्के प्रेक्षकांची अट महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात अडचणीची ठरली होती. मात्र पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता महोत्सवाने व्हावी या उद्देशातून फेब्रुवारीत आयोजन केले आहे.