‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ची सांगता

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनानंतर सवाई गंधर्व यांच्या गायनाच्या ध्वनिफीत श्रवणाने ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.

‘घेई छंद मकरंद’ या नाटय़पदानंतर ‘आधी रचिली पंढरी’ या अंभंगाचे भक्तिभावपूर्ण सादरीकरण.. गायकी अंगाचे सारंगीवादन.. स्वरांच्या लडीवाळतेने रंगलेला ‘जोगकंस’ अशा श्रवणानंदाची परमोच्च अनुभूती देणाऱ्या मैफलींनी रविवार सकाळ संस्मरणीय झाली. ग्वाल्हेर, पतियाळा आणि किराणा घराण्याच्या गायकीबरोबरच सतार आणि सरोद जुगलबंदीने एकापेक्षा एक सरस मैफलींची प्रचिती कानसेनांना सायंकाळच्या सत्रात आली. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनानंतर सवाई गंधर्व यांच्या गायनाच्या ध्वनिफीत श्रवणाने ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली. स्वर, लय आणि तालाच्या मोहमयी जगात सलग चार दिवस वावरलेल्या रसिकांनी पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये भेटण्याचे वचन देत एकमेकांचा निरोप घेतला.
ज्येष्ठ गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य शौनक अभिषेकी यांच्या गायनाने सकाळच्या सत्राचा प्रारंभ झाला. दोन बंदिशीतून त्यांनी रंगविलेल्या ‘शिवमत भैरव’ रागगायनाने प्रसन्न वातावरणाची निर्मिती झाली. त्यानंतर देवगंधार आणि जौनपुरी रागातील बंदिश त्यांनी सलगपणे सादर केली. ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ या पदानंतर ‘आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी’ हा अभंग त्यांनी समरसून गायला. ज्येष्ठ तबलावादक पं. निखिल घोष यांचे चिरंजीव ध्रुव घोष यांच्या गायकी अंगाच्या सारंगीवादनातून ‘मियाँ की तोडी’ रागाचे सौंदर्य उलगडले. ‘जोगिया’ रागातील ‘पिया के मिलन की आस’ ही रचना त्यांनी गायन आणि वादनातून रामदास पळसुले यांच्या तबलावादनाच्या साथीने रंगविली. विदूषी मालिनी राजूरकर यांच्या गायनाने सकाळच्या सत्राची सांगता झाली. त्यांनी ‘चारुकेशी’ रागातील दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर ‘गौड सारंग’ रागातील बंदिश आणि भैरवी सादर केली.
हा महोत्सव नावारूपाला आणण्यामध्ये योगदान देणारे डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त महोत्सवाचे सायंकाळचे सत्र त्यांना समर्पित करण्यात आले होते. नानासाहेबांच्या स्नुषा आणि किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांच्या गायनाने या सत्राचा प्रारंभ झाला. ज्येष्ठ गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या शिष्या आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती वैशंपायन यांच्या मैफलीनंतर स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांचे गायन झाले. प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांच्या गायनातून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे मर्म उलगडले.
चित्रपट पाश्र्वगायनामुळे लोकप्रिय असलेले सुरेश वाडकर यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल हे यंदाच्या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. अनेक गाणी रसिकांच्या ओठावर असल्याने वाडकर कोणता राग सादर करणार या विषयी कानसेनांमध्ये उत्सुकता होती. सुरेश वाडकर यांनी आपल्या खास शैलीत गायन सादर करताना पतियाळा घराण्याची वैशिष्टय़े उलगडली. यंदाच्या महोत्सवामध्ये वाडकर यांच्या गायनाला रसिकांच्या गर्दीचा उच्चांक प्रस्थापित झाला. मंडपामध्ये रसिक दाटीवाटीने बसले होते, तर संध्याकाळपासून दैनंदिन तिकीटविक्री बंद केल्यामुळे उशिरा येणाऱ्या रसिकांना मैदानामध्ये शिरण्यास जागादेखील मिळाली नाही. ज्येष्ठ सतारवादक पं. रविशंकर यांचे शिष्य असलेल्या मंजू मेहता आणि पाथरेसारथी यांच्या सतार आणि सरोदवादनाची जुगलबंदी रंगली. परंपरेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता झाली.
पडद्यामागे राहून काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांचा स्वरमंचावर सत्कार
चार दिवसांचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यशस्वीपणे पार पडतो. त्यामागे कित्येक नि:स्वार्थी कार्यकर्ते पडद्यामागे राहून काम करीत असतात. अगदी कलाकारांचे स्वागत करण्यापासून ते त्यांना साथसंगत करणाऱ्या साथीदारांची वाद्ये स्वरमंचावर नेऊन ठेवणे, कलाकारांना पाणी पिण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देणे, मैफल झाल्यानंतर स्वरमंचावरून वाद्ये नेणे, कलाकारांना आणि साथीदारांना गाडीमध्ये बसविणे यासह प्रवेशद्वारावर उभे राहून रसिकांना मंडपामध्ये सोडणे अशी असंख्य कामे हे कार्यकर्ते बिनबोभाट करतात. यातील काही कार्यकर्ते आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून, तर काही कार्यकर्ते गेली २५-३० वर्षे कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ संगीताच्या प्रेमापोटी महोत्सव यशस्वी करण्यासाठी राबत असतात. अशा कार्यकर्त्यांप्रती ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यकर्त्यांना स्वरमंचावर निमंत्रित करून मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, आनंद भाटे यांनी मायेची शाल देऊन त्यांचा हृद्य सत्कार केला. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात या कार्यकर्त्यांना मानवंदना देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sawai gandharva bhimsen mahostav sangata

ताज्या बातम्या