पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक सायली अतकरे यांची जर्मनी येथे होणाऱ्या ७५ व्या ‘लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंग’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक परिषदेसाठी निवड झाली. या परिषदेत सायली यांना नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमासाठी भारतातून निवड झालेल्या केवळ ११ युवा संशोधकांमध्ये सायली यांचा समावेश होता.
विद्यापीठ प्रशासनाने याबाबतची माहिती दिली. मूळच्या अमरावती येथील असलेल्या सायली अतकरे या विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड उपकरणशास्त्र विभागात डॉ. श्वेता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधन फेलो म्हणून कार्यरत आहेत. त्या मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क आधारित प्रगत सूक्ष्म पदार्थांचा वापर करून पर्यावरणातील विषारी प्रदूषक ओळखण्यासाठी अत्याधुनिक विद्युत-रासायनिक संवेदक विकसित करण्याच्या संशोधनावर कार्यरत आहेत. या परिषदेदरम्यान त्यांना मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क विषयातील नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञ प्रा. ओमार याघी यांच्याशी संवाद साधण्याचीही संधी मिळाली.
सायली अतकरे यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षणानंतर आता त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संधीबाबत सायली म्हणाल्या, ‘मोठ्या शहरात किंवा नामांकित संस्थेत शिकल्याशिवाय जागतिक स्तरावर यश मिळत नाही, हा समज चुकीचा आहे. मेहनत, जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवर विश्वास असल्यास जगातील सर्वोच्च व्यासपीठापर्यंत पोहोचता येते.’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन करत जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वैज्ञानिक परिषदेत सायली भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, ही विद्यापीठासाठी गौरवाची बाब असून, तिचे काम देशभरातील युवा संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स अँड उपकरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. वि. ल. मठे यांनी नमूद केले.
काय आहे ‘लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंग’?
लिंडाऊ नोबेल लॉरिएट मीटिंग ही जगातील सर्वांत प्रतिष्ठित वैज्ञानिक परिषदांपैकी एक मानली जाते. १९५१ पासून जर्मनीतील लिंडाऊ येथे आयोजित होणाऱ्या या परिषदेत नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञ आणि जगभरातील निवडक युवा संशोधक एकत्र येऊन विज्ञानातील नवीन दिशा, जागतिक आव्हाने, संशोधनातील संधी आणि भविष्यातील वैज्ञानिक प्रगती यांवर विचारमंथन करतात. या परिषदेसाठी निवड होणे हे कोणत्याही युवा संशोधकासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानले जाते, अशी माहिती विद्यापीठाने दिली.
