scorecardresearch

सय्यदभाई यांचे निधन; तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी मोठा लढा

मुस्लीम महिलांचे शोषण करणारा तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समान नागरी कायद्याचे खंदे पुरस्कर्ते, ‘दगडावरची पेरणी’ पुस्तकाचे लेखक आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यदभाई (वय ८७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

पुणे : मुस्लीम महिलांचे शोषण करणारा तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समान नागरी कायद्याचे खंदे पुरस्कर्ते, ‘दगडावरची पेरणी’ पुस्तकाचे लेखक आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यदभाई (वय ८७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. 

घरामध्ये तोल जाऊन पडल्यानंतर सय्यदभाई यांना ३० मार्च रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, वृद्धापकाळ आणि श्वसनाचा असलेला त्रास यामुळे त्यांच्या प्रकृतीची गुंतागुत वाढली. उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

सय्यद महबूब शहा कादरी हे सय्यदभाई यांचे मूळ नाव. हमीद दलवाई यांच्या प्रभावातून ते मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कृतिशील कार्यकर्ते झाले. पुढे त्यांनी मंडळाचे अध्यक्षपदही भूषविले. एकेकाळी अहल-ए-हदिस पंथाचे कट्टर अनुयायी असलेल्या सय्यदभाईंच्या आयुष्यात एक मोठे वादळ आले. त्यांच्या बहिणीला तिच्या नवऱ्याने तोंडी एकतर्फी तलाक दिला. घडलेल्या प्रकाराने पूर्णपणे हादरलेल्या सय्यदभाईंनी अनेक मुस्लीम धर्मगुरू आणि इतर मंडळींशी संपर्क साधला. पण, त्यांनी ही धर्माची बाब आहे असे सांगून हस्तक्षेप करायला नकार दिला. त्यानंतर मार्गदर्शनासाठी त्यांची भेट झाली ती हमीद दलवाईंशी आणि त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले.

 १८ एप्रिल १९६६ रोजी हमीद दलवाईंनी तलाक पीडित मुसलमान महिलांचा मोर्चा मंत्रालयावर आयोजित केला आणि मार्च १९७० मध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. या प्रवासामध्ये हमीद दलवाईंसोबत खांद्याला-खांदा जाऊन सय्यदभाई उभे होते. मात्र हमीद दलवाई यांचे अकाली निधन झाले. १९८० च्या दशकात शाहबानोच्या प्रकरणांमध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळाने या महिलेची बाजू लावून धरली. मुस्लीम सत्यशोधक मंडळ हे समान नागरी कायदा, स्त्रियांना समान अधिकार व तोंडी एकतर्फी तलाकवर बंदी या बाबत आग्रही आहे. याबाबत सामाजिक संघर्ष करत असताना आलेले बरे-वाईट अनुभव सय्यदभाई यांनी आपल्या ‘दगडावरची पेरणी’ या आत्मचरित्रात मांडले आहेत.

पद्मश्री पुरस्काराने सन्मान

सय्यदभाई यांच्या कार्याचा केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ किताबाने सन्मान केला होता. केंद्र सरकारने तोंडी एकतर्फी तलाकवर बंदी घातल्यानंतर मंडळाने याचे समर्थन केले. २०१७ मध्ये सय्यद भाई आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बहुपत्नीत्व, निकाह आणि हलाला अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घालावी अशी मागणी केली होती.  देशात आणि राज्यातील विविध भागांत मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी  सय्यदभाई यांनी ‘दगडावरची पेरणी’ या साहित्यकृतीसाठी मिळालेला राज्य पुरस्कार सरकारला परत केला होता. पुरस्काराच्या रकमेचा २५ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी सांस्कृतिक विभागाकडे पाठविला होता.

समाजाने बहिष्कृत केलेले व्यक्तिमत्त्व 

सय्यदभाई खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातील बंडखोर व्यक्तिमत्त्व होते. मुस्लीम समाजात सामाजिक कार्य करणे कठीण आहे. मात्र, एकतर्फी तोंडी तलाकच्या प्रश्नावर सय्यदभाई रस्त्यावर उतरले. त्यावेळी समाजाने त्यांना बहिष्कृत केले होते. मात्र, सय्यभाई यांनी कायम समाजासोबत संवाद ठेवला. तलाकबाबत कायदा झाला आणि मुस्लीम महिलांना सरंक्षण मिळाले. हमीद दलवाई यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. मात्र, सय्यदभाई यांनी देशभरात संघटन केले. शहाबानो प्रकरणात तर ते झपाटल्यासारखे कार्य करत होते. पीडित महिलांना काम मिळवून देणे, आर्थिक मदत करण्यातही सय्यदभाई यांचा पुढाकार होता.

– डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

सामाजिक कार्यावर निष्ठा

प्रतिकूल परिस्थितीतही सय्यदभाई यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात सहभाग घेतला. हमीद दलवाईंच्या खांद्याला खादा लावून त्यांनी सामाजिक कार्य केले. तलाकच्या प्रश्नावर त्यांनी आयुष्यभर कार्य केले. तलाकबाबत प्रबोधन करण्यात त्यांचा मोटा वाटा होता. म्हणून ते सर्व सामाजिक चळवळीचे आधारवड होते. त्यांची भूमिका आणि कार्यावरील निष्ठेमुळे अनेक सुधारणा झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

– प्रा. शमसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ

 मुस्लीम महिलांचे आधारवड

मुस्लीम महिलांच्या प्रश्नांवर सय्यदभाई यांनी प्रदीर्घकाळ कार्य केले आहे. पुरोगामी चळवळींशीही त्यांनी स्वत:ला जोडून ठेवले होते. तलाक पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. मुस्लीम महिलांच्या पाठीशी ते संवेदनशीलतेने उभे राहिले. हमीद दलवाई यांच्यासमवेत काम करताना प्रारंभीपासून ते धर्मनिरपेक्षतेच्या प्रवाहासोबत होते. सध्याचे धार्मिक वातावरण पाहता या काळात सय्यदभाईंची खरी गरज होती.

– प्रा. रझिया पटेल, संयोजक, मुस्लिम महिला संविधान हक्क परिषद

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sayyadbhai passed away big fight end triple divorce ysh