पुणे : ‘देशातल्या एका अत्यंत छोट्या गावातून माझ्या जडणघडणीची सुरुवात झाली. सातवीपर्यंत माझ्या पायात शाळेत जाण्यासाठी साधी चप्पलही नव्हती. अनवाणी प्रवास करावा लागायचा. पण, आता त्याच मुलाने न्यूयॉर्कमधील फिफ्थ एव्हेन्यू या जगातील सर्वात महागड्या रस्त्यावर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चा बॅज लावून अभिमानाने पाऊल ठेवले. हा प्रवास केवळ एसबीआयच्या कार्यसंस्कृतीमुळे शक्य झाला,’ अशी भावना एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी यांनी व्यक्त केली.

‘एसबीआयमध्ये प्रगती करण्यासाठी कोणत्याही वशिल्याची गरज पडत नाही. या संस्थेत तुमच्या पदवीपेक्षा तुमच्या कष्टाला आणि क्षमतेला अधिक महत्त्व दिले जाते. प्रामाणिक संधी दिली जाते,’ असेही त्यांनी नमूद केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी सेट्टी आणि ‘५एफ वर्ल्ड’चे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, संचालक दीनानाथ खोलकर या वेळी उपस्थित होते. 

सेट्टी म्हणाले,‘आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीचा दाखला देत सेट्टी म्हणाले, एसबीआयमध्ये प्रत्येकाला समान संधी मिळते. माझ्या ३७ वर्षांच्या प्रवासात कोणीही मला शैक्षणिक पात्रता काय आहे, पदवीतील स्कोअर काय आहे, सुवर्णपदक मिळाले किंवा किती टक्के गुण मिळाले, असे विचारले नाही. कल्पनाही करता येणार अशा संधी मला मिळाल्या.’

वर्क बर्नाआउट नाही

‘आजची तरुण पिढी सतत कामाच्या ताणाची तक्रार करत असते. तरुणांमध्ये वाढलेल्या वारंवार नोकरी बदलण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी भाष्य केले. सेट्टी म्हणाले, कामात वैविध्य असेल, तर कंटाळा येण्याचा प्रश्नच उद्भवतत नाही. काल २७ वर्षांच्या काही तरुणांशी बोलताना प्रत्येकाने वर्क बर्नआउटबद्दल सांगितले. त्यांना एकाच भूमिकेत २० ते २२ बदल हवे होते. आमच्या काळात अशा तक्रारी नव्हत्या. मी अशा बँकेशी जोडलो गेलो, जिथे लोक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू होतात आणि निवृत्तीपर्यंत सेवा देतात. इथे ‘बर्नआउट’ ही संकल्पनाच नाही. गेल्या ३७ वर्षांत बँकिंग उद्योगात मी केलेले नाही, असे एकही काम नाही. एसबीआयमध्ये प्रत्येकवेळी नवीन भूमिका आणि नवीन आव्हान मिळते,’ असेही त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षण आणि शिस्त

सेट्टी म्हणाले,‘प्रशिक्षण हा बँकेच्या प्रगतीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एसबीआयमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षाला सरासरी ६० तास प्रशिक्षण दिले जाते. गेल्या वर्षी एसबीआयने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ५८० कोटी रुपयांची तरतुद केलेली. इतकी मोठी रक्कम प्रशिक्षणावर खर्च करणारी दुसरी कोणती संस्था असेल, असे वाटत नाही. नवीन अधिकाऱ्यांना आम्ही उत्पादनांची माहिती देण्यापूर्वी ‘ग्राहक सेवा’ म्हणजे काय आणि ग्राहकांच्या अपेक्षा काय असतात, हे शिकवतो.’

एसबीआयचा आकार दुप्पट

‘२०१७ ते २०२४ या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपला ताळेबंद दुप्पट केला. हे साध्य करताना आम्ही कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट केली नाही किंवा शाखांची संख्याही दुपटीने वाढवली नाही. आम्ही योग्य तंत्रज्ञानात गुंतवणूक केली. ग्राहकांना डिजिटल पद्धतींकडे वळवले. आता दर सहा वर्षांनी एसबीआय आपला आकार दुप्पट करेल आणि भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलत राहील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.