प्रदूषणामुळे पावसाच्या प्रमाणात १२ ते १५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे दुष्काळाची स्थिती उद्भवत आहे, सोबतच ग्लोबल वॉर्मिगमुळे हवामानात बदल होऊन अनिश्चित गारपीटीची समस्याही वाढली आहे. या समस्यांवर ‘स्के लर व्हेव जनरेटर’ यंत्र हा रामबाण उपाय ठरतो, असा दावा या यंत्राची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘दत्ता लॅब्स’चे डॉ. दत्तात्रय जाधव यांनी केला आहे.
मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज फॉर रेन मेकिंग’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक रिसोनेटर्स, तांब्याचे पाईप आणि इतर साहित्याच्या उपयोगाने हे यंत्र तयार करण्यात आले आहे. या यंत्राद्वारे स्के लर हवेचा झोत ढगात सोडण्यात येतो. या हवेच्या झोतामुळे ढग विरघळतात आणि जवळ असलेल्या ढगांत विलीन होतात. या प्रक्रियेमुळे ढगाच्या पाऊस पाडण्याच्या क्षमतेत वाढ होते, तसेच ढगांमध्ये तयार झालेल्या गारा विरघळल्यामुळे गारपीटीची शक्यता कमी होते. पर्वतांच्या अडथळ्यामुळे नैसर्गिक पाऊस पडतो, स्के लर व्हेव जनरेटर हे लहान पर्वतांचे कार्य करते. हे यंत्र दोन ते सहा किलोमीटर क्षेत्रासाठी उपयोगी आहे.
चीन, रशिया, इस्राईल, दक्षिण अफ्रिका अशा विविध देशात या तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येत आहे. भारतात देखील या तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक पद्धतीने वापर करण्यात येत आहे. दत्ता लॅब्स तर्फे २०१२ मध्ये पुण्यात सर्वप्रथम कोथरुड येथे हे यंत्र लावण्यात आले होते. त्यानंतर शहापूर, नानग, अतित, बुलढाणा, पाँडिचेरी अशा विविध ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
मान्सूनच्या ढगांवर विमानातून रसायनांची फवारणी केल्यास कृत्रिम पाऊस पाडता येतो. पण ही अत्यंत खर्चिक पद्धती आहे. याउलट स्के लर व्हेव जनरेटर च्या माध्यमानी ९० हजार ते दीड लाख रुपये खर्चात पावसात वाढ व गारपीटीत घट साध्य करता येऊ शकते. भारतात ही सर्वात कमी खर्चिक पद्धती आहे, असा दावाही डॉ. जाधव यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2015 रोजी प्रकाशित
गारपीट थांबवणे, पावसाचे प्रमाण वाढवणे ‘स्केलर व्हेव जनरेटर’ यंत्रामुळे शक्य – ‘दत्ता लॅब्स’ चा दावा
स्के लर व्हेव जनरेटर च्या माध्यमानी ९० हजार ते दीड लाख रुपये खर्चात पावसात वाढ व गारपीटीत घट साध्य करता येऊ शकते.

First published on: 17-06-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scaler wave generator