PAT Exam Schedule No Change: राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) घेण्यात येणाऱ्या संकलित चाचणी २ (पॅट) या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ११, १५ आणि २२ एप्रिल या दिवशी होणार आहे. १५ एप्रिल रोजीच्या गणिताच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चाचणी परीक्षेनंतर १० टक्के उत्तरपत्रिकांची यादृच्छिकपणे तपासणी करण्यासह पटपडताळणीसाठी शाळाभेटी करताना प्राधान्याने अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना भेटी देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा वेळापत्रकानुसारच

राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. एससीईआरटीने ९ मार्च रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी अनुक्रमे प्रथम भाषा, तृतीय भाषा या विषयांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ९ मार्च रोजी संचालक डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात गणिताची परीक्षा १६ एप्रिल रोजी होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करून पॅट परीक्षा ११ एप्रिल, १५ एप्रिल, २२ एप्रिल या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचनांनुसार संकलित चाचणी २ सकाळच्या सत्रातील शाळांनी सकाळी ८ ते ११ या वेळेत, तर दुपारच्या सत्रातील शाळांनी १२ ते ३ या वेळेत घ्यावी. मात्र, इयत्तानिहाय दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि वेळापत्रकानुसारच घ्यावी. त्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये. संबंधित इयत्तांची चाचणी घेण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची, संबंधितांची असेल. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी संकलित चाचणी २ पूर्वी पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, मुख्याधापक, शिक्षक यांनी ऑनलाइन बैठक घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी बैठक घेऊन करावे. संबंधित नियोजन तालुक्यांना कळवावे. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे. शाळाभेटी करताना प्राधान्याने अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना भेटी देण्याचे नियोजन करावे. चाचणी कालावधीत १०० टक्के शाळा भेटी होतील याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.