पिंपरी : तळेगाव एमआयडीसीतील शाफलर इंडिया या कंपनीत अग्निशमन यंत्रणेच्या देखभाल कामादरम्यान कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.गौरीशंकर शर्मा (वय ३८, रा. आंबी, मावळ) आणि वैभव भाऊसाहेब थोरात (वय २४, रा. चिखली) अशी मृत्यू झालेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. प्रमोद जैस्वार, श्रीकृष्ण साहू आणि सुशोभन पाखीरा यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसीमध्ये शाफलर इंडिया कंपनी आहे. या कंपनीत वाहनांच्या बॉल बेअरींगचे उत्पादन होते. मंगळवारी कंपनीतील अग्निशमन सिलींडरच्या देखभाल आणि तपासणीचे काम सुरू होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अग्निशमन सिलींडरमधून अचानक कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती सुरू झाली. गॅसचे प्रमाण वाढल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तीन कर्मचारी बेशुद्ध पडले.
घटनेची माहिती मिळताच सहकार्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. बेशुद्ध झालेल्या कर्मचार्यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच गौरीशंकर आणि वैभव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रमोद जैस्वार यांच्यासह तिघांवर उपचार सुरू आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनी व्यवस्थापनाकडून आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली आणि संबंधित विभाग रिकामा करण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, सुरक्षा उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या दुर्घटनेप्रकरणी अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार, पुढील कारवाई करण्यात येईल, असे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
