‘सा’ (स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन) या संस्थेतर्फे ‘जागतिक छिन्नमानसिकता जनजागृती दिना’निमित्त मंगळवारी (२४ मे) खुल्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी चेन्नईच्या ‘स्किझोफ्रेनिया रीसर्च फाऊंडेशन’चे संचालक व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आर. थारा यांचे व्याख्यान होणार आहे. मानसिक आजार झालेल्या रुग्णाची काळजी घेणे व त्यांची सुधारणा यात कुटुंबाची भूमिका काय असावी, या विषयावर डॉ. थारा बोलणार आहेत.
‘सा’चे अध्यक्ष अमृत कुमार बक्षी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आदित्य पेंडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी संस्थेतर्फे व्याख्यानाचे आयोजन केले जाते. २४ तारखेला दुपारी ४ वाजता मयूर कॉलनी येथील बालशिक्षण शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून केंद्र शासनाचे माजी आरोग्य सचिव केशव दासराजू या वेळी उपस्थित राहणार आहेत. शासनाने गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्याच्या संदर्भात काय केले, या विषयावर दासराजू आपली मते मांडतील.