पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची  प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेकडून शाळांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, शाळांनी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी ही माहिती दिली. पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आणि टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आल्याने परीक्षा परिषदेत पोलिसांकडून करण्यात येणारा तपास आदी कारणांमुळे परीक्षा लांबणीवर पडली. आता २० जुलैला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्रे १ जुलैपासून संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची मुद्रित प्रत काढून सर्व परीक्षार्थ्यांना तातडीने वितरीत करावे. तसेच परीक्षार्थी, पालक यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

परीक्षेसाठी परीक्षा केंद्र निश्चितीचे काम पूर्ण झालेले आहे. तर परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी ’जिल्हा समन्वयक’ तर गटशिक्षणाधिकारी, वॉर्ड ऑफिसर हे ’तालुका समन्वयक’ म्हणून काम पाहणार आहेत. परीक्षेसाठी ३१ डिसेंबरपूर्वी सेवानिवृत्त होत नसलेले शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करावी. केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्यासच कार्यक्षम सेवाज्येष्ठ उपशिक्षकाची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. एकदा नियुक्त केलेल्या केंद्र संचालकांच्या नावात शक्यतो बदल करण्यात येऊ नये, तसेच उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिपाई यांची नियुक्ती करण्यासंदर्भातील सूचनाही देण्यात आल्या आहेत.