पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी सुरळीत पार पडली. त्यात चौथीच्या ९४.६० टक्के विद्यार्थ्यांनी, तर सातवीच्या ९३.८८ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उन्हाच्या तीव्र झळा असतानाही सुमारे पावणे अकरा लाख विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

यंदा पाचवी आणि आठवीसह चौथी आणि सातवी या वर्गांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित ही परीक्षी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये चौथी आणि सातवीच्या मिळून एकूण ११ लाख ५५ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी दिली. इयत्ता चौथीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ६ लाख ९४ हजार ५९७ विद्यार्थांपैकी ६ लाख ५७ हजार ७७ विद्यार्थांनी परीक्षा दिली.

तर इयत्ता सातवीच्या ४ लाख ६२ हजार १३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी चार लाख ३३ हजार ८५७ विद्यार्थांनी परीक्षा दिली.जिल्हानिहाय विद्यार्थी संख्येत पुणे जिल्हा राज्यात प्रथम आहे. पुण्यातून इयत्ता चौथीच्या ६७ हजार ७५५ आणि सातवीच्या ४० हजार ३७३ विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यानंतर अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा मिळून ३४ टक्के सहभाग आहे. चौथीच्या तुलनेत सातवीचे विद्यार्थी दोन लाखांहून अधिक संख्येने कमी आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातही समाधानकारक सहभाग नोंदविला गेला. नागपूर, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांत मध्यम सहभाग दिसून आला. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, ‘राज्यातील सुमारे साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

वेळेमध्ये बदल करण्यासंदर्भात कोणतीही मागणी परीक्षा परिषदेने मान्य केली नाही. शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या पेपरमधील प्रश्नांबाबत राज्य परीक्षा परिषदेकडे अद्याप कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. नियमित प्रक्रियेनुसार शिष्यवृत्ती परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत उत्तरसूची जाहीर करण्यात येईल. त्यानंतर त्या उत्तर सूचीवर आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली जाईल.

त्यावेळेस पालकांना, शिक्षकांना आक्षेप नोंदवता येतील. त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेतर्फे अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात येईल.’ पेपरमधील प्रश्नांवर आक्षेप शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत पालक आणि शिक्षकांचे आक्षेप आहेत. काही प्रश्नांसाठी दिलेले पर्याय हे अनुसरून नसल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.