पुणे : इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांत पुणे जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली. राज्य गुणवत्ता यादीत पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सरस ठरल्या. जिल्हा परिषद शाळांतील सातवीच्या ४३, तर चौथीच्या ४४ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
जिल्हा परिषदेने याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथील यशवर्धन थोरातने ९८.६६ टक्के गुणांसह चौथीच्या, तर वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रदिशा गाडे या विद्यार्थिनीने ९६ टक्के गुणांसह सातवीच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला. सातवीच्या राज्य गुणवत्ता यादीतील १२६ पैकी ४८ विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील, त्यातील ४३ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांतील आहेत. इयत्ता चौथीच्या राज्य गुणवत्ता यादीतील १२० पैकी ४४ विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांतील आहेत.
पुणे जिल्हा परिषदेतर्फे ‘पुणे मॉडेल स्कूल’ प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये गुणवत्ताधारित अध्यापन, संकल्पनाधारित अध्ययन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित परीक्षण, सातत्यपूर्ण मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियोजनबद्ध तयारी, शिक्षकांची क्षमतावृद्धी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच, कौशल्याधारित शिक्षण, तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर देण्यात येत आहे.
‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन केलेले मार्गदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचा अतिरिक्त सराव, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे पुणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी राज्यात आघाडीवर आहेत,’ असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.
‘चौथी, पाचवी, सातवी, आठवी या चारही इयत्तांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षांत पुणे जिल्ह्याने, जिल्हा परिषद शाळांनी अव्वल कामगिरी करणे अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, क्षमतेला शिक्षकांकडून योग्य दिशा मिळत आहे,’ असे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी नमूद केले.
इयत्ता पाचवी, आठवीनंतर चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांतही पुणे जिल्हा राज्यात प्रथमस्थानी आहे. तसेच, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळाही राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आघाडीवर आहेत. चारही शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये पुणे जिल्ह्याने मिळवलेले यश सातत्यपूर्ण गुणवत्तावृद्धीचे उदाहरण आहे. या यशात ‘पुणे मॉडेल स्कूल’ प्रकल्पाचा महत्त्वाचा वाटा आहे. – गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद
