केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण वाढवण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती योजना जाहीर केली असून गुणवत्तेच्या आधारे त्यासाठी प्रवेश घेता येणार आहे. पूर्व परीक्षेपासून मुलाखतीपर्यंत तीन टप्प्यांमध्ये उमेदवारांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या योजनेनुसार परीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या दिल्ली येथील खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य मिळणार आहे.  त्याचप्राणे महिना दहा हजार रुपयांचा निर्वाहभत्ता देखील मिळणार आहे. उमेदवार मागील तीन वर्षांच्या कालावधीत किमान एकदा मुलाखतीपर्यंत पोहोचलेला असला पहिजे. वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबातील उमेदवारच यासाठी पात्र ठरणार आहेत. या शिष्यवृत्तीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महिन्यांपूर्वी निर्णय झाला होता. त्याचा शासननिर्णय प्रसिद्ध झाला आहे.
पूर्वपरीक्षेपासून मुलाखतीपर्यंतच्या तिन्ही टप्प्यांसाठी एकदाच ही शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा अशा एखाद्या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास आणखी एक संधी घेऊन पुढील टप्प्यासाठीच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. ही शिष्यवृत्ती घेणाऱ्या उमेदवारांनी शासनाने पर्याय दिलेल्याच दिल्ली येथील संस्थेची निवड करायची आहे. त्या संस्थेचे शुल्क शासनाकडून परस्पर जमा करण्यात येणार आहे.