पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्तरावरील पीएच.डी.चा विशेष प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना महिना साधारण २५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्तरावरील पीएच.डी.चा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सेट, नेट, पेट (पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट) यांपैकी एखादी परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा गेट परीक्षेमध्ये ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. ते विद्यार्थी या प्रकल्पामध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. मात्र, या प्रकल्पाअंतर्गत पीएच.डी. करण्यासाठी वयाची अट असून खुल्या गटासाठी २६ वर्षे आणि राखीव वर्गासाठी २८ वर्षे अशी वयोमर्यादा आहे. पात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या देशातील कोणत्याही भागातील विद्यार्थ्यांला या प्रकल्पामध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेता येईल. सर्व विद्याशाखांसाठी हा प्रकल्प लागू असून शंभर विद्यार्थ्यांना या प्रकल्पामध्ये सहभागी होता येणार आहे. या विद्यार्थ्यांना महिना साधारण २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या फंडातून ही योजना राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पीएच.डी.ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा संशोधन नियतकालिकामध्ये दोन वर्षांनी शोधनिबंध प्रसिद्ध होणे आवश्यक आहे.
याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले, ‘‘विद्यापीठाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. पेटचा दुसरा पेपर झाला, की ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी शिष्यवृत्तीसाठीची प्रक्रिया फक्त वेगळी राहणार आहे.’’