राज्य शासनाच्या नव्या स्कूल बसच्या नियमावलीमध्ये स्कूल व्हॅनचा समावेश करून त्यातूनही विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली, तरी त्यात बसविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत अद्यापही निश्चिती नाही. याचाच फायदा घेऊन व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून बसविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. स्कूल बस नियमावलीच्या अंमलबजावणीस जबाबदार असणाऱ्या शालेय समित्यांना याचे काहीही देणेघेणे नाही व प्रशासनही डोळे मिटून गप्प बसल्याचे चित्र आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना झालेले अपघात लक्षात घेता विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वीच नवी स्कूल बस नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये स्कूल बसबाबत काटेकोर नियम करण्यात आले आहेत. नियमावलीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा व शहर तापळीवर तसेच प्रत्येक शाळांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यातील बहुतांश समित्या केवळ कागदावरच असल्याने नियमावलीतील नियमांचा धाक नसल्याचे चित्र दिसते आहे. त्याचेच उदाहरण स्कूल व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतून दिसून येते आहे.
शहरातील अरुंद रस्ते किंवा एखाद्या भागात कमी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अशा ठिकाणी मोठी स्कूल बस जाणे शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी व्हॅन उपयुक्त असल्याने नव्या नियमावलीमध्ये काही अटी घालून व्हॅनमधूनही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. वाहन १५ वर्षांपेक्षा जुने नसावे, पिवळा रंग, विद्यार्थ्यांची चढ-उतार करण्यासाठी महिला सहायक, अग्निशमन यंत्रणा आदी स्कूल बससाठी असणारे सर्व नियम स्कूल व्हॅनसाठीही लागू आहेत. या नियमांचे पालन होते की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. मात्र, सद्य:स्थितीला बहुतांश व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून भरले जात असल्याचे दिसते. त्यामुळे अशा प्रकारची विद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायक ठरू शकते.
यंदाचे शालेय वर्ष सुरू झाल्यानंतर नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी शालेय समित्या किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरुवातीला काही हालचाली झाल्या. नियमावलीचे पालन न करणाऱ्या स्कूल बसवर परिवहन कार्यालयाकडून कारवाई झाली. मात्र, त्यानंतर शालेय समित्यांसह प्रशासनही स्कूल बसच्या धोरणाबाबत थंड झाले आहे. त्यामुळे स्कूल बसबाबत नियमबाह्य़ गोष्टींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.