बालपणीचा काळ बदलांचा, ते नीट स्वीकारण्याचा शालेय जीवनापासूनच आपण सारे कोणत्या ना कोणत्या बदलांना सामोरे जातो. या बदलांना सामोरे कसे जायचे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये अभ्यागत अध्यापक म्हणून ‘बदल’ या विषयाचा अभ्यासक्रम शिकवणारे आणि महर्षी कर्वे संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करणारे चेतन सहस्रबुद्धे यांच्याशी नवे शालेय वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

बदल या विषयाकडे तुम्ही कोणत्या प्रकारे पाहता?

  • बदल एक नित्य, वेगवान आणि विस्कळीत करणारी गोष्ट आहे. आपल्या अवतीभोवती विविध स्तरांवर होणारे बदल किंवा अभ्यासक्रम वा पाठ्यपुस्तके बदलल्याने होणारे स्थित्यंतर असेल, या बदलांना ज्याचे त्यालाच सामोरे जावे लागते.
    बदलांना सामोरे कसे जावे?
  • आपण बदलांना दोन प्रकारे सामोरे जाऊ शकतो. एक म्हणजे कुठल्याही बदलाचा निष्क्रिय स्वीकार आणि दुसरे म्हणजे बदल सकारात्मक व्हावा म्हणून दिलेला सक्रिय सहभाग. आपल्या भवतालात सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर असा बदल घडविण्याची मानसिकता असणारे समाज घटक आपल्याला लागतील. अशा व्यक्ती घडायला वयाची अट नसली, तरी वय वर्ष सहा ते सोळा किंवा शालेय शिक्षणाचा काळ हा असे ‘चेंजमेकर्स’ घडण्यासाठी महत्त्वाचा आहे.

त्यासाठी काय करावे लागेल?

  • मानसशास्त्रीयदृष्ट्या वय वर्षे दहानंतरचा काळ ‘स्व’ची ओळख आणि त्याचबरोबर सहानुभूती आणि सामाजिक जाणिवा ठळक करण्याचा काळ असतो. हे लक्षात घेऊन; कुटुंब, शेजार, समाज आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शाळा अशा सर्व पातळ्यांवर बदलाची मानसिकता घडविण्यासाठी पोषक परिस्थिती उत्पन्न करायला लागेल. आजही बहुसंख्य शाळांची गुणवत्ता ‘दहावीचा निकाल काय लागला’ यावर मोजली जाते. किंबहुना आपण असे म्हणू शकतो की, विद्यार्थ्यांची क्षमता, त्यांची गुणवत्ता, त्यांची कौशल्ये मोजायची दुसरी फूटपट्टीच आपल्याकडे समाज म्हणून उपलब्ध नाही. ती निर्माण करण्याची गरज आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित गटातील विषयांचा अतिरेकी आग्रह कमी करून, युवक आणि युवतींमधे बदल घडविण्याची मानसिकता किती आणि कशा पद्धतीने विकसित झाली, याची आपण नोंद केली आणि बदल घडवू पाहणाऱ्या युवांसाठी सामाजिक परिसंस्था विकसित केली, तर नक्कीच आपल्याला आजूबाजूला सकारात्मक बदल घडताना दिसायला लागेल. अर्थातच त्यासाठी पद्धतशीर प्रयत्नदेखील करावे लागतील. बदलाची परिभाषा बोलणारा वर्ग आपल्याला तयार करायचा असेल, तर आपल्याला संरचनात्मक प्रयत्न करायला लागतील. शालेय पातळीवर शाळा ही ‘ब्रेव्ह स्पेस’ म्हणून मुलांना अनुभवता यायला हवी. टागोरांचे ‘व्हेअर द माइंड इज विदाउट फीअर’चे स्वप्न कमीत कमी शालेय परिसंस्थेत तरी अस्तित्वात यावे म्हणून आपण आग्रही असायला हवे.

शैक्षणिक व्यवस्थेत कोणते बदल करावे लागतील ?

  • आपल्या शिक्षकांना शाळेच्या माध्यमातून सशक्त शैक्षणिक अनुभव घडवावे लागतील. ‘ट्रान्समिशन बेस्ड’ शिक्षणाचा पारंपरिक साचलेपणा ते विद्यार्थीकेंद्रित ‘अनुभवजन्य’ शिक्षणाचा अतिरेक या दोन्हींमधल्या विविध शैक्षणिक वाटा धुंडाळायला लागतील. वर्तनात्मक बदलातून, वितर्क प्रक्रियेतून, बौद्धिक प्रारूपे वापरून, गट-शिक्षणाद्वारे, आभासी वास्तवाचा वापर करून; अशा रूढ पण कदाचित आपल्याला अपरिचित अशा शिकण्या-शिकवण्याच्या पद्धती वापरायला लागतील. ‘मग मी काय करू,’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित कराव्या लागतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर शिक्षकांना स्वतःलादेखील शोधावे लागेल. शालेय शिक्षक ‘बदलाचे अग्रदूत’ असायला हवेत. बदलाचे कारक म्हणून या शिक्षकांना काही निर्णयांचे अधिकार, त्याचबरोबर संस्थात्मक आधार द्यावा लागेल आणि गट म्हणून काम करण्याच्या क्षमता अशा शिक्षकांमध्ये विकसित कराव्या लागतील. शिक्षकाची सकारात्मक बदल घडविण्याची मानसिकताही असायला हवी. आता फक्त गरज आहे, ती अशा प्रयत्नांचा परीघ विस्तारण्याची.
    shriram.oak@expressindia.com