शाळांमध्ये पंचाहत्तर टक्के जागांची प्रवेश प्रक्रिया करण्याचे स्वातंत्र्य शाळांना आहे. मात्र, हे प्रवेश शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले असून या महिना अखेपर्यंत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येऊ नये, असे परिपत्रक २२ नोव्हेंबरला शिक्षण विभागाने काढले आहे. शाळांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही वेळापत्रक देण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागा वगळता बाकीच्या ७५ टक्के जागांची प्रवेश प्रक्रिया करण्याचे स्वतंत्र्य शाळांना राहणार आहे. मात्र, शिक्षण संचालनालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार हे प्रवेश करण्याचे बंधन शिक्षण विभागाने घातले आहे. या महिना अखेपर्यंत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर्षीपासून फक्त २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. सध्या सुरू असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबत सध्या शिक्षणाधिकारी माहिती घेत आहेत. आपापल्या विभागातील शाळांची बैठक घेऊन त्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्याची सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्यावर्षीही शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर केले होते. तीन वेळा वेळापत्रक जाहीर करूनही खासगी शाळांनी वेळापत्रक पाळले नव्हते. अखेरीस फक्त २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणे करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, यावर्षी पुन्हा सर्व प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणे करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. ‘‘सर्व शाळांचे प्रवेश साधारण एकाच कालावधीमध्ये होणे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयीचे आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्याची शाळांची तक्रार होती, त्यामुळे वेळापत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊ शकली नाही. मात्र, यावर्षी एप्रिल-मे महिन्यातच प्रवेश प्रक्रिया राबवण्याची सूचना शाळांना यापूर्वीच देण्यात आली आहे आणि वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे,’’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.