इंदापूरमध्ये शिक्षण विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष

तानाजी काळे

इंदापूर : करोनाच्या संसर्गात गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असताना विद्यार्थी येण्यापूर्वी शाळेच्या आवाराची तपासणी करून योग्य त्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्याबाबत शिक्षण विभागाने नियमावलीही जाहीर केली आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील बहुतांश शाळा पाहता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी तालुक्यातील शाळांची तपासणी करण्यात आली की नाही, याबाबत काळेवाडी येथील शाळेची आवस्था पाहिल्यानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळेवाडी येथील शाळा काही वर्षांपूर्वी नव्या इमारतींनी सज्ज झाली .या इमारतींना शासनाचा मोठा खर्च झाला. या शाळेभोवती आता अलीकडेच संरक्षण भिंत  नव्याने बांधण्यात आली. मात्र भिंत बांधल्यावर या बांधकामाचा राडारोडा आवारातच नव्हे, तर शाळेच्या उंबऱ्यापर्यंत आला आहे. मोठमोठे दगड गोटे, विटा, कपच्या यांचे ढीग शाळेच्या आवारामध्ये विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे शाळेचा पुढचा परिसरच व्यापून गेलेला आहे. आजूबाजूला पाण्याच्या टाकीची दलदल असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असून अशा वातावरणात गेले दीड-दोन वर्ष शाळेच्या बाहेर असलेली मुले, शाळेच्या आवारात रमणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळेच्या आवाराच्या या अवस्थेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून, हा राडारोडा तातडीने हलवण्याची गरज आहे. शाळेच्या आवारातील सांडपाण्यामुळे सांडपाण्यामुळे या ठिकाणी डासांचे साम्राज्यही आहे. िवचू , काटय़ांपासून या ठिकाणी मुलांना संरक्षण मिळावे यासाठी काही ग्रामस्थांनी राडारोडा उचलण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करण्यात येतो आहे.