परिस्थिती पाहून १५ डिसेंबरनंतर निर्णय, महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे : ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता सावधानता म्हणून शहरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मंगळवारी घेतला. यापूर्वीच्या निर्णयानुसार पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग बुधवार (१ डिसेंबर) पासून सुरू होणार होते. मात्र शाळा सुरू करायच्या किंवा कसे, याबाबतचा निर्णय परिस्थिती पाहून पंधरा डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरातील शाळा यापुढेही दृकश्राव्य संवाद (ऑनलाइन) पद्धतीने सुरू राहणार आहेत.

करोना संसर्ग नियंत्रणात आल्याने राज्य सरकारच्या बालकांविषयीच्या करोना संसर्ग कृती गटाने ग्रामीण भागाबरोबरच शहरातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची शिफरास केली होती. त्यानुसार राज्याच्या मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू करण्याबाबतची मार्गदर्शक नियमावली राज्याच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली होती. पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने महापालिका प्रशासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत बैठक घेण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाकडूनही नियमावलीचे पालन करत वर्ग सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र अमोयक्रॉन विषाणूचा वाढता धोक्याच्या पाश्र्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून त्याबाबतचे आदेश तातडीने काढण्यात आले. पुणे आणि खडकी कटक मंडळातील शाळाही या आदेशानुसार बंद राहणार आहेत.

शहरातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पंधरा डिसेंबर्रयत स्थगिती देण्यात आली आहे. करोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पंधरा डिसेंबर नंतर शाळांबाबतचा निर्णय घेण्यात येईल आणि त्याबाबतचे आदेश प्रसृत केले जातील. पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असून दृकश्राव्य संवाद पद्धतीने शिक्षण सुरू राहील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. पालक संघटना, शिक्षण संस्था आणि तज्ञांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरू आहेत. एक डिसेंबरपासून शहरी भागातील सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला होता. आरोग्य विभागाने आणि तज्ञांच्या कृती गटानेही त्याला सहमती दर्शविली होती. ओमायक्रॉन विषणूच्या भीतीने मात्र शाळा सुरू करायची की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे शाळा सुरू होण्यास एक दिवस बाकी असतानाही महापालिकेकडून त्याबाबतचे आदेश पारीत करण्यात आले नव्हते. त्यानंतर मंगळवारी (३० नोव्हेंबर) महापालिकेने सावधानता बाळगत हा निर्णय जाहीर केला.