पुणे : देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून प्रत्येक तीन विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी धाप न लागता धावू शकतो, असा धक्कादायक निष्कर्ष वार्षिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर आला आहे. कोविडनंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा दिसत असली तरी अनेक गंभीर त्रुटी अजूनही कायम असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
स्पोर्ट्झ व्हिलेज एज्युस्पोर्ट्स संस्थेच्या १४ व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणात देशातील ११२ शहरांतील ३३३ शाळांमधील एकूण १,४१,८४० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीविषयी केलेल्या अभ्यासांपैकी हा आतापर्यंतचा सर्वांत व्यापक अभ्यास मानला जात आहे. २०१० पासून सुरू असलेल्या या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचे सात प्रमुख घटकांवर मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), एरोबिक क्षमता, अॅनएरोबिक क्षमता, अपर बॉडी स्ट्रेंथ, लोअर बॉडी स्ट्रेंथ, कोर स्ट्रेंथ आणि लवचिकता (फ्लेक्सिबिलिटी) यांचा समावेश होता.
या अहवालानुसार, देशातील दोनतृतीयांश विद्यार्थी मूलभूत हृदय आणि श्वसन क्षमता टिकवून ठेवणारे व्यायाम सातत्याने करू शकत नाहीत. एरोबिक फिटनेस हा आयुष्यभरातील हृदयाच्या आरोग्याचा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. बालपणात याची कमतरता राहिल्यास पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्क्रीन टाइमचा परिणाम
याशिवाय सुमारे ४० टक्के विद्यार्थी निरोगी बीएमआय श्रेणीबाहेर असल्याचे आढळून आले. कोविडनंतरच्या तीन वर्षांत या प्रमाणात फारसा बदल झालेला नाही. २०२३ मध्ये ५९.१ टक्के विद्यार्थी निरोगी श्रेणीत होते, तर २०२५ मध्ये हे प्रमाण ५९.६ टक्के इतकेच राहिले.
तसेच ४९ टक्के विद्यार्थी अपर बॉडी स्ट्रेंथमध्ये कमी पडत असून ४४ टक्के विद्यार्थी लोअर बॉडी स्ट्रेंथच्या निकषांपर्यंत पोहोचत नाहीत. वाढता स्क्रीन टाइम आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे
लहानपणापासून प्रयत्न आवश्यक
याबाबत संस्थेचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मुजुमदार यांनी सांगितले की, “निरोगी बालपण घडवण्यासाठी लहान वयातच चांगल्या सवयी निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. शाळांमधील शारीरिक शिक्षण महत्त्वाचे असले तरी कुटुंब आणि समाज यांचाही त्याला पाठिंबा असणे आवश्यक आहे. मुलांच्या आरोग्याचा सातत्याने अभ्यास करून त्यावर सामूहिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी शाळा, पालक आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित करण्यात आली आहे.
