करोना विषाणू संसर्गामुळे यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाइन उपक्रमांतून साजरा के ला जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त घरीच सूर्यनमस्कार, योगासने करून त्याच्या चित्रफिती पाठवण्याची मागणी नामांकित संस्थांच्या शाळांकडून पालकांकडे करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक शहरांतील पालक आज आपल्या पाल्याच्या योगचित्रीकरणात रमण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन आज (२१ जून) साजरा के ला जातो. दरवर्षी या काळात शाळा सुरू झालेल्या असल्याने शाळांमध्ये योग दिन साजरा होतो. त्यात विद्यार्थ्यांना योगासने, सूर्यनमस्कार, ध्यान, प्राणायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्याने, प्रात्यक्षिके  आदी उपक्रम केले जातात. मात्र यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नसल्याने असे उपक्रम करणे शक्य नाही. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनही ऑनलाइन पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे घरात केलेल्या आसनांची चित्रफीत पालकांनी शाळांना पाठवावी, असे आवाहन शाळांकडून पालकांना होत आहे.

यंदा शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना घरी सूर्यनमस्कार, योगासने करण्याचे आवाहन शाळेकडून करणे समजण्यासारखे आहे. मात्र, चित्रफीत तयार करून पाठवायला सांगणे ही एकप्रकारे सक्ती झाली, असे एक पालक विनीत शहा (नाव बदलले आहे) यांनी सांगितले.

दरवर्षी शाळांमध्ये योग दिन साजरा के ला जात असला, तरी ८० टक्के शाळा योग दिनाच्या दिवशी ध्यान, प्राणायाम अशा विषयांवर व्याख्याने ठेवतात. आता यंदा शाळा नसल्याने मुलांनी घरी योगासने, सूर्यनमस्कार करून त्याच्या चित्रफिती पालकांकडून मागवणे हे अजिबातच योग्य नाही. अशा चित्रफिती मागवून घेण्याची आवश्यकताच नाही. सारे काही ऑनलाइन करण्याचा तोटा आहे आणि त्यातून काय साध्य होते हाही प्रश्नच आहे.

– डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

शाळांना काय हवे?

विद्यार्थ्यांनी योगासने, सूर्यनमस्कार घरी करावीत आणि त्याच्या तीन मिनिटांपर्यंतच्या चित्रफिती तयार करून पाठवाव्यात, असे आवाहन काही नामांकित शिक्षण संस्थांकडून पालकांच्या व्हॉट्स अ‍ॅप समूहावर करण्यात आले आहे.