पुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ‘विज्ञान रंजन स्पर्धे’साठी नोंदणी सुरू झाली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, कोणत्याही वयाच्या व्यक्ती, कोणत्याही शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. परिषदेकडून निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली.
मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे १९९३ पासून विज्ञान रंजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आता या वर्षासाठीची प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली असून, सहभागासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत या प्रश्नांची उत्तरे शोधून, लिहून पाठवायची अंतिम मुदत देण्यात आली आहे. उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून १६ फेब्रुवारीपूर्वी टिळक स्मारक मंदिराजवळील मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागात (पिन कोड – ४११०३०) येथे पोहचवण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, प्राथमिक विजेत्यांची नावे २६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर रविवारी (१ मार्च) पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे प्राथमिक विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरी होणार असल्याचेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले. प्रश्नांची उत्तरे शोधताना वैज्ञानिक दृष्टिकोन समजण्याचा अवसर मिळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी भाषा आणि मराठी भाषिक विकसित होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.
नमुना प्रश्न –
१) २० रुपयांच्या नाण्याला किती कोन आहेत?
२) विना सावलीचा दिवा कोठे वापरतात?
३) पिठीसाखर, साखर, साखऱ्या, … या मालिकेत चौथे कोण ?
४) मी एक समुद्र आहे, माझी कोणतीही लाट जमिनीला लागत नाही?
५) तव्यावर भाजली की रोटी फुगते पण तंदुरी रोटी का फुगत नाही?
याशिवाय काही प्रयोग घरातली साधने वापरून करायचे, काही गणिते, कारणे, निबंध सोडवून संस्थेच्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अधिक माहितीसाठी
परिषदेने ब्लॉगद्वारे स्पर्धेची माहिती दिली आहे. त्यासाठी https://mavipapunevibhag.blogspot.com/2025/12/2026.html?m=1 या संकेतस्थळावर आणि प्रश्नावलीसाठी
https://mavipapunevibhag.blogspot.com/2025/12/2026.html या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.
मदतीचे आवाहन
हजारो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात. त्यांच्या उत्तर पत्रिका तपासून विजेत्यांना पारितोषिके दिली जातात. त्यासाठी मदतीची अपेक्षा असून, शक्य त्या मार्गाने सहकार्य करावे, असे आवाहन परिषदेने केले आहे. आपण स्वतः विज्ञान रंजन स्पर्धा 2026 मध्ये भाग घ्यावा, आपल्या आसपासच्या लोकांना याबद्दल माहिती देऊन सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे, उत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना बक्षिसे देण्यास आर्थिक सहाय्य करावे, असेही परिषदेने स्पष्ट केले आहे.
आर्थिक सहाय्यासाठी तपशील
नाव – Marathi Vidnyan Parishad Pune Vibhag
बँक – IDBI
शाखा – Sadashiv Peth Pune 30
बचत खाते क्रमांक – 49010010077236
IFSC CODE – IBKL0000490
