‘एनसीएल’मधील संशोधन

पुणे :  डेंग्यू, चिकुनगुनिया अशा रोगांसाठी आणि झिका विषाणूचा वाहक असलेल्या एडिस इजिप्ती या डासाच्या प्रौढ मादीला दूर ठेवणाऱ्या परिणामकारक रेणूचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञांच्या गटाने या संदर्भातील संशोधन केले असून, त्याचा शोधनिबंध ‘एसीएस ओमेगा’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

करोनाच्या महासाथीच्या काळात  देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे निदर्शनास आले. करोनाच्या रुग्णांमध्ये आधीच ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर अधिक ताण निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जम्मू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या संस्थेचे संचालक डॉ. डी.एस. रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखाली एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात एडिस इजिप्ती या डासाच्या प्रौढ मादीला दूर ठेवण्यात परिणामकारक ठरणारे संशोधन शास्त्रज्ञांनी केले. संशोधकांच्या गटात अक्षय कुलकर्णी, रेम्या रमेश, सफल वालिया, शाहबाझ सय्यद, गणेश गठालकर, सीतारामसिंग बालामकुंडू, मनाली जोशी, अवलोकितेश्वर सेन, डी. श्रीनिवास रेड्डी यांचा समावेश आहे.

डीट स्कॅफोल्डवर आधारित संयुगांच्या संग्रहाची निर्मिती करण्यासाठी या संशोधक गटाने सिलिकॉन स्वीच पद्धतीचा उपयोग केला. संश्लेषित केलेल्या २५ संयुगांतील एका रेणूने अधिक काळ परिणामकारकता दाखवली. सिलिकॉनच्या समावेशामुळे परिणामकारकतेमध्ये वाढ झाल्याची माहिती एनसीएलकडून देण्यात आली.

व्यावसायिकीकरणाचा प्रयत्न

दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने शोधलेल्या रेणूचा अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. प्रतिबंधक रेणू बाजारात आणण्यासाठी व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने काही कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे एनसीएलकडून सांगण्यात आले.