पुणे : दूर अंतरावरील एका ताऱ्याच्या सुमारे नऊ महिने अंधूकतेच्या रहस्याची उकल शास्त्रज्ञांनी केली आहे. या ताऱ्याच्या समोरून गेलेली प्रचंड वलय (रिंग सिस्टिम) असलेली वस्तू या अंधुकतेचे कारण असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) संशोधक डॉ. सारंग शाह, तैवानमधील अकॅडेमिया सिनीका संस्थेतील डॉ. जोनाथन मार्शल यांचा या संशोधनात सहभाग होता. तसेच कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. आशिष महाबळ यांनीही काही निरीक्षणांसाठी योगदान दिले. मोनोसेरोस तारका समूहातील ‘एएसएएसएसएन२४एफडब्ल्यू ’ या ताऱ्याचा प्रकाश २०२४ च्या उत्तरार्धापासून २०२५ च्या मध्यापर्यंत कमी झाला होता. ताऱ्यांच्या ग्रहण घटना काही दिवस किंवा आठवडे टिकतात. या ताऱ्याची सुमारे दोनशे दिवस टिकलेली अंधुकता दुर्मीळ ठरली. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी निरीक्षणातून या ताऱ्याचा अभ्यास केला. स्वतः स्थिर असलेल्या या ताऱ्याच्या तेजामध्ये होणारा बंद अंतर्गत कारणांमुळे झालेला नव्हता, तर या ताऱ्यासमोरून गेलेल्या एका मोठ्या वस्तूने त्याचा प्रकाश दीर्घकाळ झाला गेल्याचे या निरीक्षणातून दिसून आले.
विविध प्रारूपांवरून मॉडेल्सवरून असे दिसून येते की, हा तारा मंद होण्याचे सर्वांत संभाव्य स्पष्टीकरण म्हणजे हा तपकिरी बटू तारा आहे. या ताऱ्याला एका विशाल आणि दाट वलय प्रणालीने (रिंग सिस्टम) वेढले. त्यामुळे तारा वलयासह दूर अंतरावर ताऱ्याभोवती फिरत आहे. अशा दीर्घ काळ टिकणाऱ्या घटना असामान्य आहेत. वलयाचे बाह्यभाग पातळ असल्याने या ताऱ्याचे अंधुक होणे हळूहळू सुरू झाले. घनदाट प्रदेश ताऱ्यासमोरून जाताच तो तारा जवळपास अदृश्य झाला, असे डॉ. शाह यांनी सांगितले.
वलय प्रणाली मोठ्या वस्तूंभोवती अपेक्षित आहेत. मात्र, त्यांची वैशिष्ट्ये निश्चित करण्यासाठी त्यांचे थेट निरीक्षण करणे कठीण आहे. या दुर्मीळ घटनेतून जटिल प्रणालीचा तपशीलवार अभ्यास करण्यास होते. या ग्रहणाचा अभ्यास करताना ‘एएसएएसएसएन२४एफडब्ल्यू’ या ताऱ्याच्या परिसरात आणखी एक लाल बटू तारा असल्याचे आढळून आले, असे डॉ. मार्शल यांनी नमूद केले.
संशोधन का महत्त्वाचे?
ताऱ्याच्या या सहचर वस्तूचे वस्तुमान गुरू ग्रहाच्या तिप्पट आहे. त्याची वलय प्रणाली प्रचंड (सुमारे ०.१७ खगोलीय एककापर्यंत विस्तारित) आहे. सूर्य आणि बुध यांच्यातील अर्ध्या अंतराएवढा याचा व्यास आहे. तसेच या ताऱ्याच्या भोवती त्याचे स्वतःचेही एक वलय (बहुधा भूतकाळातील किंवा सध्या सुरू असलेल्या ग्रहांच्या टक्करींचे अवशेष) आहे. हे वलय या वयाच्या ताऱ्यासाठी (सुमारे १ अब्ज वर्षांपेक्षा जास्त) असामान्य आहे, असे या घटनेच्या फोटोमेट्रिक आणि स्पेक्ट्रोस्कोपिक विश्लेषणातून दिसून आल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. हे संशोधन बटू तारा, मोठ्या वलय प्रणाली अशा उपतारकीय साथीदारांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ताऱ्यांभोवती तयार होणाऱ्या रचना समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. जेडब्ल्यूएसटी, अल्मा, व्हीएलटी अशा मोठ्या दुर्बिणींचा वापर करून या प्रणालीचा सखोल अभ्यास करण्यासाठी निरीक्षणे घेतली जाणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

