उत्क्रांतीच्या सुरुवातीला सजीवांमधील पहिली हालचाल कशी झाली असू शकेल याचे गूढ उकलण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. जलीय सूक्ष्मजीव हायड्राच्या अभ्यासातून उतींच्या ताठरतेमुळे हाडे आणि स्नायूंचा विकास होत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले असून, सजीवांच्या हालचालीबाबतचे हे पहिलेच संशोधन आहे.
हायड्राच्या हालचालींबाबतचे संशोधन जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजी या संशोधनपत्रिके त प्रसिद्ध झाले आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) जीवशास्त्रज्ञ डॉ. संजीव गलांडे, भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. अप्रतिम चॅटर्जी आणि इस्रायलमधील डॉ. इरिट सागी यांचा संशोधनात सहभाग आहे. हायड्रा हा सूक्ष्मजीव पाण्यात आढळतो. त्याला सूक्ष्मदर्शकातून पाहावे लागते. उत्क्रांतीच्या टप्प्यात शरीरात हाडे नसताना सजीवांनी केलेल्या पहिल्या हालचालीचे गूढ या संशोधनामुळे उकलले आहे. बहुपेशीय प्राण्यांमध्ये हालचाल कशी सुरू झाली असावी याची दिशा संशोधनातून मिळाली आहे.
संशोधनाबाबतची माहिती डॉ. गलांडे यांनी दिली. ‘जेलीफिशसारखे प्राणी कसेही फिरतात. पण भक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ठरवून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी प्राण्याला नियमबद्ध हालचाली कराव्या लागतात. त्यासाठी प्राण्याच्या शरीराची तशी रचना असावी लागते. हायड्राच्या शरीराच्या वरच्या भागातील उतींचा ताठरपणा उर्वरित शरीराच्या जवळपास तिप्पट असतो. वरच्या भागातील उती स्प्रिंगसारखे कार्य करतात. त्या ऊर्जेमुळे हायड्रा डोके खाली आणि पाय वर अशा स्थितीत जातो. प्रयोग करताना स्प्रिंगसारखे कार्य करणाऱ्या उती तोडल्या असता हायड्रा उभाच राहू शकला नाही. त्यामुळे उतींच्या ताठरतेमुळे हाडे आणि स्नायूंचा विकास होतो असे दिसून येते. त्यासाठी उतींचा ताठरपणा हालचालींसाठी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे,’ अशी माहिती डॉ. गलांडे यांनी दिली.
आंतरविद्याशाखीय संशोधनाला दिशा
सजीवाच्या हालचालीबाबतचे हे संशोधन मूलभूत स्वरूपाचे असून वैद्यकीय ते मायक्रोरोबोटिक्स अशा व्यापक स्तरावर हे संशोधन महत्त्वाचे आहे. या संशोधनातून आंतरविद्याशाखीय संशोधनाला दिशा मिळू शके ल, असेही डॉ. गलांडे यांनी नमूद केले.
