अनोख्या उपक्रमातून सामाजिक संस्थांना हजारो रुपयांची मदत
रविवार सुटीचा.. रविवार निवांतपणे दिवस घालवण्याचा.. रविवार फिरायला जाण्याचा.. रविवार मजेचा.. असे रविवारचे वातावरण असले तरी दक्षिण पुण्यात सुरू झालेल्या एका अनोख्या उपक्रमामुळे महिन्याचा चौथा रविवार रद्दी दानाचा.. अशी सवय नागरिकांना लागली आहे. शिवाय या उपक्रमामुळे सामाजिक संस्थांना हजारो रुपयांची मदतही मिळत आहे.
बिबवेवाडी परिसरातील डॉ. भगली हॉस्पिटलसमोर हा उपक्रम चालवला जातो. या भागात रा. स्व. संघाची विवेकानंद साप्ताहिक शाखा भरते. या शाखेतील कार्यकर्त्यांनी सामाजिक संस्थांना साहाय्य करण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे आणि उपक्रमाचा प्रतिसाद वाढता आहे. ‘रद्दी विक्रीतून निधी’ या उपक्रमासंबंधीची माहिती मंदार अत्रे आणि प्रा. अनीश सोमण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
सामाजिक कामांना काही ना काही मदत करण्याची अनेकांची इच्छा असते. पण नेमकी कोणाला मदत करायची आणि काय मदत करायची याची माहिती योग्यप्रकारे मिळत नाही. त्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी बिबवेवाडी येथे सकाळी नऊ ते अकरा या वेळात हा उपक्रम चालतो. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरातील एक महिन्याची साठलेली रद्दी आणून द्यावी, असे आवाहन केले जाते. सरासरी दहा किलो रद्दी प्रत्येकाकडून दिली जाते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाकडून दर महिन्याला सेवाकार्यासाठी किमान शंभर रुपयांचा निधी मिळतो.
महिन्याच्या चौथ्या रविवारी नागरिक मोठय़ा संख्येने या केंद्रावर रद्दी घेऊन येतात. काही सोसायटय़ा व अपार्टमेंटमधील रद्दी एकत्र केली जाते आणि ती केंद्रावर पाठवली जाते. केंद्राची वेळ संपल्यानंतर ही सर्व रद्दी लगेचच या व्यवसायात असलेले एक व्यावसायिक घेऊन जातात. ते त्यांची या उपक्रमाला मदत म्हणून बाजारभावापेक्षा थोडा अधिक दर देतात. रद्दीविक्रीतून येणारी सर्व रक्कम एका सामाजिक कार्यासाठी निधी म्हणून दिली जाते. ज्या संस्थेला निधी दिला जातो त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनाही केंद्रावर बोलावले जाते. ते कार्यकर्ते येणाऱ्या सर्वाना त्यांच्या संस्थेची माहिती देतात. या केंद्रावर रद्दी घेऊन येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच किती रद्दी दिली याची नोंद लॅपटॉपवर केली जाते. सहभागी होणाऱ्या या सर्वाचा व्हॉटस् अॅप ग्रुपही तयार करण्यात आला आहे आणि चौथ्या रविवारची आठवण त्याद्वारे सर्वाना केली जाते. हा उपक्रम पाहून बिबवेवाडीत लेकटाऊन परिसरातही अशाच प्रकारचा उपक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे.
उपक्रम सुरू झाला तेव्हा परिसरातील सात-आठशे घरांमध्ये जाऊन आम्ही या उपक्रमाची माहिती दिली. तसेच पत्रकेही वाटली. दोन-तीन महिने आम्ही घरोघरी संपर्क केला. त्याचा चांगला परिणाम झाला. परिसरातल्या नागरिकांना आता चौथ्या रविवारी रद्दी नेऊन द्यायची याची सवय लागली आहे.आठवण ठेवून नागरिक केंद्रावर येतात, असा अनुभव अत्रे यांनी सांगितला.