रंग काळा, उंची एक फूट, चॅम्पियन, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या वंशावळीतील वरासाठी.. स्वजातीय जोडीदार पहिजे. हा वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचा ओळखीचा ढाचा आता पाळीव श्वानांना जोडीदार शोधण्यासाठी संकेतस्थळावर झळकू लागला आहे.

वधू-वर संशोधनातले श्रम आणि त्यामागील मान-अपमान ‘मॅट्रिमोनिअल’ वेबसाइटच्या आगमनानंतर दूर झाले. अनुरूप जोडीदाराचे रंग-जात-वंश-गोत्र अनुरूप असंख्य पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या वेबसाइट्स सुरू झाल्या, तेव्हा त्यांच्याकडे खूळ म्हणून पाहिले गेले. आता त्या आत्यंतिक गरजेचे काम पार पाडत आहेत. उलट आता या संकेतस्थळाचा आदर्श घेऊन ‘पेट मॅट्रिमोनिअल’ची संकल्पना देशभरातील शहरांमध्ये रुजत आहे. हजारो श्वान आणि मांजर पालक या संकेतस्थळांवर आपल्या प्राण्याला जोडीदार मिळवून देण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करीत आहेत, इतकेच नाही तर आपल्या श्वान-मांजरीची तोंडओळख तसेच गुणमहात्म्याचे प्रोफाइल सातत्याने समाजमाध्यमावर अपडेट करीत आहेत.

आपल्या घरातील कुत्र्या-मांजराला माणसांप्रमाणे नावे ठेवण्यापासून, त्याच्या वाढदिवसाच्या मेजवान्या रंगवण्यापर्यंत घरातील या सदस्याची सरबराई करण्यात आत्मसुख मानतो. त्यातूनच पाळीव प्राण्यांशी निगडित शेकडो उत्पादन आणि सेवांची यंत्रणा निर्माण झाली आहे. ‘पेट मॅट्रिमोनिअल साइट्स’ हा त्यात जमा झालेला ताजा आविष्कार आहे.

घरी पाळलेल्या श्वानाचे किंवा मांजराचे कितीही लाड केले, तरीही त्यालाही सवंगडय़ांची गरज असते. ही गरज भागली नाही, तर प्राण्यांमध्येही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यांची वागणूक बदलते. अशावेळी प्राण्यासाठी जोडीदार शोधण्याचा पेच पालकांपुढे उभा राहतो. श्वानाची किंवा मांजराची पुढील पिढी चांगली निपजण्यासाठी प्रजाती, प्राण्याचे गुणधर्म, त्याची वंशावळ (ब्लडलाइन), वैशिष्टय़े असे विविध मुद्दे लक्षात घेतले जातात. साधारणपणे शहरातील केनल क्लब्स पालकांना यासाठी मदत करतात. मात्र त्या क्लबचे सदस्य असलेल्या, प्राणी ‘चॅम्पियन’ असेल, त्याच्या वंशावळीची नोंद असेल त्यांनाच ही मदत मिळू शकते. मात्र वंशावळीची नोंद नसतानाही हौस म्हणून पाळलेल्या प्राण्यांना जोडीदार शोधणे हे वर किंवा वधू शोधण्याहूनही कठीण होऊन बसते. अशा पालकांसाठी ‘पेट मॅट्रिमोनियअल’ संकेतस्थळे मदत करत आहेत. भारतात २००९ मध्ये पाळीव प्राण्यांसाठी विविध सेवा पुरवणाऱ्या ‘डॉगस्पॉट’ या संस्थेने प्राण्यांसाठी ‘मॅट्रिमोनिअल’ संकेतस्थळ सुरू केले. सध्या देशभरात १५ ते २० संकेतस्थळे यासाठी आहेत. राज्यातही मुंबई आणि पुण्यात प्राण्यांसाठी जोडीदार शोधून देणाची सेवा देणारी ही संकेतस्थळे कार्यरत आहेत. याशिवाय फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातूनही प्राणिपालकांची ही शोध मोहीम सुरू असते. याशिवाय छोटय़ा जाहिरातींसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओएलएक्स, क्विकर यांसारख्या संकेतस्थळांवरही ‘जोडीदार हवा.’च्या जाहिराती दिसून येतात.

जोडीदार मेळावे..

संकेतस्थळावरून पालक भले आपल्या श्वानासाठी जोडीदाराची निवड करतील. मात्र ज्याच्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाते, त्या पाळीव श्वानालाही पालकाने पसंत केलेला जोडीदार आवडावा लागतो. त्याचप्रमाणे पालकांचीही एकमेकांशी ओळख होणे आवश्यक असते. त्यातून फक्त संकेतस्थळांवर ओळख करून देण्यापलिकडे मेळाव्यांचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. तपशिलातील बदल वगळले, तर ज्या प्रमाणे वधू-वर मेळावे रंगतात किंवा लग्न जमवणाऱ्या कुणा मध्यस्थाकरवी कांदेपोह्य़ाचे कार्यक्रम होतात अगदी तसेच हे प्राण्यांसाठी जोडीदार शोधण्याचेही मेळावेही रंगतात. प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास करणारे समुपदेशक, पशुवैद्य, प्रशिक्षक या मेळाव्यांमधून पालकांना मार्गदर्शन करतात. परदेशात अशा सशुल्क मेळाव्यांची संकल्पना पुरती रुजलेली आहे. मेळावे घेण्याचे प्रमाण भारतात नसले, तरी आता इकडेही हे लोण हळूहळू वाढते आहेत. दिल्ली, बंगळुरू येथे असे मेळावे काही संस्थांकडून घेतले जातात. मुंबई, पुण्यातील काही पेट रिसॉर्ट्सही असे मेळावे घेण्यासाठी पुढाकार घेतात.