बारामती, फलटणमधून दररोज दीड ते दोन टन द्राक्षे फळबाजारात

पुणे :  द्राक्षांची हंगामपूर्व आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. बारामती, इंदापूर, फलटण भागातून बाजारात द्राक्षांची आवक होत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या दररोज दीड ते दोन टन हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. घाऊक बाजारात सोनाका, तास ए गणेश या जातीच्या पाच किलो द्राक्षांना प्रतवारीनुसार ५०० ते ६०० तसेच दहा किलो द्राक्षांना ९०० ते १२०० रुपये असे दर मिळाले आहेत. हलक्या प्रतवारीच्या दहा किलोस द्राक्षांना ३०० ते ५०० रुपये असे दर मिळत आहेत. गेल्या वर्षी हवामानामुळे द्राक्षांच्या प्रतवारीवर परिणाम झाला होता. बाजारात विक्रीस पाठविण्यात आलेल्या हंगामपूर्व द्राक्षांची प्रतवारी चांगली आहे, पुणे शहर, उपनगर तसेच िपपरी परिसरातील फळ व्यापाऱ्यांनी हंगामपूर्व द्राक्षांची खरेदी केली, अशी माहिती फळ बाजारातील द्राक्ष व्यापारी अरिवद मोरे यांनी दिली.

लोणावळा, महाबळेश्वर भागात सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. या परिसरातील विक्रेत्यांची द्राक्षांना मागणी आहे. द्राक्षांचा हंगाम डिसेंबर महिन्यात सुरू होतो. एप्रिल महिन्यापर्यंत हंगाम सुरू राहतो. बाजारात आंबा दाखल झाल्यानंतर द्राक्षांना मागणी कमी होते, किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार द्राक्षांना प्रतवारीनुसार ७० ते १५० रुपये असे दर मिळत असल्याचे मोरे यांनी नमूद केले

करोना संसर्गामुळे द्राक्ष विक्रीवर गेल्या वर्षी परिणाम झाला होता. संसर्ग कमी झाल्याने यंदाच्या हंगामात द्राक्षांना चांगली मागणी राहील. केरळ, गुजरात, कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडून द्राक्षांना मागणी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. परराज्यातील तसेच राज्यातील व्यापारी आता थेट द्राक्ष बागांमधून माल खरेदी करत आहेत.

अरविंद मोरे, द्राक्ष व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड