पुणे : अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करीत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सध्या देशातील पूर्वोत्तर भाग आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होत असून, महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे १६ मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला. १७ मे रोजी मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. मात्र, १८ मे रोजी त्यांनी उत्तर-पूर्व दिशेने बंगालच्या उपसागरात प्रगती केली. दक्षिणेच्या बाजूने मात्र त्यांनी अद्याप प्रगती केलेली नाही. मात्र, पोषक वातावरण असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरासह दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारतील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पूर्वोत्तर भागातील आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांसह पश्चिम बंगाल, त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आदी भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. पावसात आघाडीवर राहणाऱ्या चेरापुंजीमध्येही सध्या जोरदार पाऊस होत असून, या भागात २०० ते २५० मिलिमीटर पावसाची नोंद होत आहे.

राज्यस्थिती..

पुढील दोन ते दिवस दिवस कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात २१ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.

पाऊसभान..

मोसमी वारे सक्रिय होऊन आता अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून वाऱ्यांचा प्रभाव वाढला असून, त्यामुळे काही भागांत कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत.

उष्णतेची लाटही..

महाराष्ट्रात सध्या तापमानाची दुहेरी स्थिती आहे. बहुतांश भागांत अद्यापही दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या पुढे आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पाचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागात पावसाळी वातावरणही निर्माण झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seasonal rain sea favorable conditions monsoon winds ysh
First published on: 19-05-2022 at 00:02 IST