scorecardresearch

मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीआयएसएफ’च्या जवानांचा पहारा

मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि स्थानिक पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला असून, गुरुवारी मतमोजणी होणार आहे.

Security ballot boxes Chinchwad byelection
मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी 'सीआयएसएफ'च्या जवानांचा पहारा (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील मतपेट्या थेरगाव येथील शंकरराव गावडे कामगार भवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मतपेट्यांसाठी स्ट्राँग रूम बनविण्यात आली. मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि स्थानिक पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला असून, गुरुवारी मतमोजणी होणार आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. ५०.४७ टक्के मतदान झाले. मतदान झाल्यानंतर शंकरराव गावडे कामगार भवन येथे सर्व मतपेट्या ठेवण्यात आल्या. येथील स्ट्राँग रूम सील करण्यात आली. २ मार्च रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे ९० जवान, स्थानिक पोलिसांचे दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि २० अंमलदार यांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – कसबा पोटनिवडणुकीची गुरुवारी मतमोजणी; कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

हेही वाचा – पुणे विद्यापीठ कुलगुरूपदासाठी दुसऱ्यांदा अर्ज प्रक्रिया

स्ट्राँग रूम असलेल्या परिसरात चार मनोरे उभारण्यात आले आहेत. तेथून स्ट्राँग रूम आणि परिसरावर निगराणी ठेवली जात आहे. रात्रीच्या वेळी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त दर दोन तासांनी स्ट्राँग रूमला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेत आहेत. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक पक्षाला स्वतंत्र व्यवस्था करण्याचे पोलिसांचे नियोजन सुरु आहे. मतमोजणीनंतर कोणलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मतदारसंघात  बंदोबस्त लावला जाणार आहे. निवडणूक काळात निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या अनुचित प्रकारांच्या घटनास्थळी देखील मतमोजणीच्या दिवशी चोख बंदोबस्त पुरवला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 15:45 IST