scorecardresearch

वीज ग्राहकांना बनावट संदेश पाठविण्याचे प्रकार

वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा किंवा दुव्याला प्रतिसाद द्यावा, अशा स्वरूपाचे वीजविषयक बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकील आले आहेत.

संबंधित एसएमएस, दुव्याला प्रतिसाद न देण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे : वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा किंवा दुव्याला प्रतिसाद द्यावा, अशा स्वरूपाचे वीजविषयक बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकील आले आहेत. त्यामुळे अशा वैयक्तिक क्रमांकांवरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला किंवा त्यातील दुव्यांना ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित एसएमएस, समाजमाध्यमावरील संदेशाला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. देयक भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एखादा दुवा पाठविण्यात आला असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच यंत्रणेद्वारे एसएमएस पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (CXQF.  VM- MSEDCL, VK- MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत संदेशातून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणकडून एसएमएसद्वारे पूर्वनियोजित देखभाल आणि दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख आणि वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीज देयकाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

शंका असल्यास महावितरणशी संपर्क करा

वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा अन्य संदेश, फोन तसेच देयक भरण्याच्या दुव्याला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. संदेशात नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका किंवा तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sending fake messages power consumers ysh