वृद्धत्वात भावनिक, मानसिक, सामाजिक आणि सुरक्षिततेच्या अनेक गरजा असतात. त्या समजून घेऊन त्यानुसार काम करणारी आणि मानवी दृष्टिकोन असलेली व्यवस्था आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कार्य करणाऱ्या ‘वृद्धमित्र’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बेनझीर पाटील यांच्याशी नुकत्याच झालेल्या (१५ जून) ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ, दुर्लक्ष जागरूकता’ दिनाच्या अनुषंगाने श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
आजच्या ज्येष्ठांना कोणत्या समस्या भेडसावताना दिसतात ?
– ज्येष्ठांचे आयुर्मान वाढले असले, तरी त्यांच्या जगण्याचा दर्जाही तेवढाच महत्त्वाचा आहे. बदलती कुटुंबव्यवस्था, स्थलांतर, शहरीकरण, वाढती स्पर्धा आणि धकाधकीची जीवनशैली यामुळे गुंतागुंतीच्या झालेल्या वृद्धांच्या गरजांकडे दुर्लक्ष होते. कर्करोग, पक्षाघात, स्मृतिभ्रंश, अल्झायमर्स यांसारखे गंभीर असंसर्गजन्य आजार वाढत आहेत. त्याबरोबरच एकटेपणा, मानसिक ताण, आर्थिक असुरक्षितता आणि अंथरुणाला खिळलेले किंवा निराधार वृद्ध अधिक असुरक्षित बनत आहेत. एकंदरीतच वृद्धांची काळजी म्हणजे केवळ आरोग्यसेवा नसून, त्यांना सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगण्याचा मूलभूत हक्क मिळवून देणे हेही आहे.
ज्येष्ठांची सकारात्मकता वाढावी यासाठी कसे काम केले जाते?
– वृद्धाश्रम ही सोय असली, तरी वृद्धाश्रमात स्वखुशीने कोणालाच जायचे नसते. त्यामुळे ‘सन्मान आणि आवश्यक त्या सोयीसुविधांसह वृद्धत्व स्वतःच्या घरात’ या संकल्पनेवर संपूर्ण कार्यक्रम आधारित आहे. ‘वृद्धमित्र’चे मुख्य ध्येय ज्येष्ठांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हा असून, यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य, सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंध, त्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि आत्मिक आनंद या सर्व पातळ्यांवर काम केले जाते. यासाठी वैद्यकीय सेवांबरोबरच दैनंदिन कामात मदत, सहवास, भावनिक आधार, मार्गदर्शन यांचीही गरज असते. या सेवा एकत्रित व सुसूत्र पद्धतीने दिल्या गेल्या नाहीत, तर वृद्धांच्या एकूण जीवनगुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वृद्ध आणि कुटुंबीयांचे समुपदेशन, मानसिक-भावनिक आधार अशा विविध बाबींचा अंतर्भाव ‘वृद्धमित्र’च्या कार्यात आहे. त्यासाठी कुटुंबीय, भोवतालच्या व्यक्तींना या वृद्धांना आधार देण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
ज्येष्ठांना कोणकोणत्या सेवा दिल्या जातात?
– ज्येष्ठांना त्यांच्या कामासाठी सुरक्षितपणे नेणे आणि परत घरी घेऊन येणे, घरीच प्राथमिक आरोग्य तपासणी करून गरजेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भ देणे, अत्यावश्यक सेवासुविधांशी जोडणे, डॉक्टरांशी संपर्क साधून (व्हिडिओ कॉलद्वारे) रुग्णासाठी तातडीने सल्ला व मार्गदर्शन मिळवून देणे, अशा सेवा दिल्या जातात. योग्य ठिकाणी संदर्भ देऊन सवलतीच्या दरात मदत मिळवून दिली जाते. विविध सामाजिक संस्थांशी जोडून आरोग्य शिबिरांचा लाभ मिळवून दिला जातो. आवश्यकतेनुसार त्यांच्या जीवनावश्यक वस्तू, औषधे, रुग्णोपयोगी साहित्य मोफत दिले जाते. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्या व्यसनाधीन मुलांना उपचारांसाठी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले जाते.
यासाठी कार्यकर्ते कशा प्रकारे निवडले जातात?
– ही संकल्पना २०१८ पासून पुणे, मुंबई, भोपाळ, ग्वाल्हेर, वाराणसी, लखनौ, दिल्ली, खैरताल-तिजारा (राजस्थान) या शहरांमध्ये आणि जवळपासच्या ग्रामीण भागात राबवली जात आहे. दर वर्षी जवळपास ६० हजारांहून अधिक वृद्धांना या कार्यक्रमाचा लाभ मिळत आहे. यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते निवडून, प्रशिक्षण दिले जाते. ते वृद्धांना घरभेटी देऊन त्यांची परिस्थिती समजून घेतात आणि त्यांना आवश्यक त्या सेवा मिळवून देतात.
या कार्यक्रमाची पुढील दिशा काय आहे ?
– ही संकल्पना काही ठरावीक प्रकल्पांपुरती मर्यादित न राहता, अधिक व्यापक स्तरावर नेऊन शासनाच्या नियमित आरोग्य आणि सामाजिक सेवा व्यवस्थेत समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने संस्थेचे कार्य सुरू आहे. वृद्धांची काळजी ही सेवा नाही, तर त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काशी जोडलेली जबाबदारी आहे. ती सगळ्यांनीच जाणून घेण्याची गरज आहे.
shriram.oak@expressindia.com
