मुदत ठेव परत मिळवण्यासाठी एका ज्येष्ठ दाम्पत्याला संघर्ष करावा लागला. दाम्पत्याने दाद मागितल्यानंतर ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशनने मदतीचा हात दिला आणि मुदत संपल्यानंतर दाम्पत्याला २१ वर्षांनी मुदत ठेवीची रक्कम परत मिळाली. कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणारे विनायक पवार आणि मीरा विनायक पवार यांना नुकतीच मुदत ठेवीची रक्कम मिळाली. याबाबत पवार दाम्पत्याने ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशनशी संपर्क साधून कायदेविषयक मदत मागितली होती.
हेही वाचा >>> Sharad Pawar: “आधी आमचा विश्वास बसत नव्हता, पण आता…”, बाबा आढाव यांना भेटल्यानंतर EVM वर शरद पवारांचं मोठं विधान
पवार दाम्पत्याने लेखी तक्रार दिल्यानंतर फाउंडेशनने एका सहकारी बँकेशी पत्र व्यवहार केला. मुदत ठेवीची रक्कम परत करण्याचे सूचित केले. ठेवीदाराला २१ वर्षांनंतर मुदत ठेव मिळाली नसल्याने ग्राहक कायद्यातंर्गत दाद मागण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर बँकेने पवार दाम्पत्याला पत्र पाठवून मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत केली. पवार दाम्पत्याने बँकेच्या बिबवेवाडी शाखेत १९९८ मध्ये ४० हजार रुपये मुदत ठेव ठेवली होती. २००३ मध्ये मुदत संपली.
हेही वाचा >>> कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी शहरांमध्ये वीजनिर्मिती प्रकल्प आवश्यक
मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे ठेवीदाराला रक्कम परत करणे बंधनकारक आहे. मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत करणे बंधनकारक आहे. मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बँकेने पवार दाम्पत्याला याबाबतची माहिती दिली नाही. त्यानंतर पवार दाम्पत्याने बँकेशी संपर्क साधून मुदत ठेव परत करण्याची लेखी विनंती केली. मात्र, बँकेने रक्कम परत केली नाही. त्यांनी फाउंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर पाठपुरावा करून पवार यांना मुदत ठेवीची रक्कम परत मिळवून दिली, असे फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. महेंद्र दलालकर यांनी नमूद केले.