लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घोले रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेणुकदास नारायण जोशी (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश जावळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रेणुकदास जोशी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाशीची राणी चौकातून घोले रस्त्याकडे निघाले होते. झाशीची राणी चौकातील कोपऱ्यावर मोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात जोशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.
घोले रस्ता परिसरात तीन ते चार उपाहारगृहे आहेत. उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीमुळे या भागात कायम कोंडी होत असते. झाशीची राणी चौकातील सिग्नल सुटल्यानंतर भरधाव वेगाने वाहने येतात. घोले रस्त्यावर उपाहारगृहातून बाहेर पडणाऱ्या मोटारी, तसेच गर्दीमुळे या भागात कायम कोंडी होते. उपाहारगृह, तसेच आईस्क्रीम दुकानाबाहेर बेशिस्तपणे वाहने लावण्यात येत असल्याने या भागातून चालणे देखील अवघड झाले आहे, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या आहेत.