scorecardresearch

पुणे : शस्त्रक्रिया करताना गरम पाणी सांडल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी, खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

अपघातात डोक्याला गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान गरम पाणी सांडल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुणे : शस्त्रक्रिया करताना गरम पाणी सांडल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी, खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : अपघातात डोक्याला गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान गरम पाणी सांडल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांविरोधात कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिरालाल सारवान (वय ७०, रा. दौंड) असे जखमी झालेल्या रुग्णाचे नाव आहे. याबाबत ॲड. सुरेश सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल सारवान सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. ते दौंडमध्ये राहायला असून दररोज सायंकाळी ते व्यायामासाठी बाहेर जातात. ४ जानेवारी रोजी त्यांना एका दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने दौंडमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय निदानात सारवान यांच्या डोक्याच्या अंतर्गत भागात रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ५ जानेवारी रोजी त्यांना कोरेगाव पार्क भागातील इनलॅक्स बुधराणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सारवान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा – पुण्यात कोयता गँगचा कहर, कोंढव्यामध्ये दहशत; पाच वाहनांची तोडफोड

सारवान अतिदक्षता विभागात असून त्यांना सध्या भेटता येणार नाही, असे डाॅक्टरांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी ॲड. सारवान, त्यांची आई वडिलांना भेटायला गेले. तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांचे पोट, हातावर भाजल्याचे व्रण आढळून आले. ॲड. सारवान यांनी डाॅ. महेशकुमार यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा सारवान यांचे शरीर थंड पडले आहे. त्यांना उब देण्यासाठी वापरलेली गरम पाण्याची पिशवी गळल्याने पोट, हातास भाजल्याचे त्यांनी ॲड. सारवान यांना सांगितले.

जखम चिघळल्याचे लक्षात आल्यानंतर ॲड. सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक नाईक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 15:46 IST

संबंधित बातम्या