विमाननगर भागामध्ये चोरीच्या उद्देशाने घरामध्ये शिरून ज्येष्ठ नागरिकाचा खून केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने रविवारी, २५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल जुग्गुलाल विश्वकर्मा (वय २०, रा. सम्राट चौक, विमाननगर) असे या आरोपीचे नाव आहे. सतीशचंद्र गोपाळराव द्रविड (वय ८६, रा. व्हेलेनशिया सोसायटी, विमाननगर) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी द्रविड यांचे कुटुंबीय त्यांच्या एका नातलगाकडे गणेशोत्सवासाठी गेले होते. द्रविड हे आजारी असल्याने ते घरीच थांबले होते. त्या दिवशी चोरीच्या उद्देशाने घरात शिरून द्रविड यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांचा खून केल्याचा आरोप विश्वकर्मा याच्यावर आहे. खून केल्यानंतर घरातील दागिने, रोकड असा एक लाख तीस हजारांचा ऐवज चोरून नेला.
पोलिसांनी या प्रकरणी सोसायटीत येणाऱ्या विविध लोकांची चौकशी केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस विश्वकर्मा याच्यापर्यंत पोहोचले. विश्वकर्मा हा द्रविड यांच्या सोसायटीतील नागरिकांचे कपडे धुणे व इस्त्रीसाठी घेऊन जाण्याचे काम करीत होता. त्याच्या कपडय़ावर रक्ताचे डाग व घटनास्थळी त्याच्या पायातील स्लीपरही आढळून आली. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग असल्याबाबत तपास करण्यासाठी पोलिसांकडून विश्वकर्माच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली.