पुणे : शिवाजीनगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे शिवाजीनगर भागात राहायला आहेत. शनिवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी नऊच्या सुमारास ते शिवाजीनगर भागातील सागर अपार्टमेंटसमोर थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरुन दोन चोरटे तेथे आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला धमकावले. त्यांच्या खिशातील रोकड आणि कागदपत्रे हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

महापालिका भवन परिसरात थांबलेल्या तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण धायरी भागात राहायला आहे.

१३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुण महापालिका भवन परिसरात थांबला होता. धायरीकडे जाण्यासाठी त्याने ॲपचा वापर करुन मोटार नोंंदणी केली. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील ६० हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस कर्मचारी अशोक धावडे तपास करत आहेत.

येरवड्यातील कल्याणीनगर परिसरात एकाकडील एक लाख रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेण्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मूळचा दिल्लीचा आहे. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुण कल्याणीनगर भागात थांबला होता. दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून नेला.पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.

एसटी प्रवासी महिलेचा ऐवज चोरी

प्रवासी महिलेकडील ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय महिला सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावच्या रहिवासी आहे. त्या सांगली ते स्वारगेट दरम्यान एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून १५०० रुपये, सोन्याचे दागिने, मोबाइल संच, कागदपत्रे असा ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. पोलीस कर्मचारी फरांदे तपास करत आहेत.