लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : औंध भागातील परिहार चौक परिसरातून पहाटे फिरायला निघालेले समीर राय चौधरी (वय ७७) यांच्यावर चोरट्यांनी गुरुवारी हल्ला केला होता. चौधरी यांच्या डोक्यात चोरट्यांनी गज मारला. मेंदू-मृत झालेल्या चौधरी यांचा शुक्रवारी सायंकाळी औंधमधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चोरट्यांनी चौधरी यांच्यासह तिघांवर हल्ला केला होता. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यासह त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.

याबाबत श्रेयस सतीश शेट्टी (वय ३०, रा. अश्विनी सोसायटी, औंध रस्ता, खडकी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय ३८, रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साइट, परिहार चौक, औंध) आणि समीर रॉय चौधरी (वय ७७, रा. सायली गार्डन सोसायटी, औंध) गंभीर जखमी झाले होते. चौधरी यांच्यावर ओैंधमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान चौधरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी दिली.

आणखी वाचा-कल्याणीनगर अपघात प्रकरणात अगरवाल दाम्पत्यासह तिघांची येरवडा कारागृहात रवानगी

याप्रकरणी जय सुनील घेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांपैकी एका मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपींना दारूचे व्यसन आहे. नशेसाठी त्यांनी लूटमार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रेयस शेट्टी गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास सायकलवरून निघाले होते. औंध येथील पूर्वी मोबाइल दुकानासमोर चार तरुण थांबले होते. चोरट्यांकडे दुचाकी होती. चोरट्यांनी शेट्टी यांना अडवले आणि पैशांची मागणी केली. तेव्हा शेट्टी यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर एका चोरट्याने शेट्टी यांच्या खिशातील रोकड काढून घेण्याचा प्रयत्न केला. चोरट्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने शेट्टी यांच्या डोक्यात गज मारला. प्रसंगावधान राखून त्यांनी वार हुकविला आणि ते तेथून पळाल्याने बचावले. मात्र, त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा मंगलम कन्स्ट्रक्शन या गृहप्रकल्पाच्या परिसरात चोरटे मंडल यांना गजाने मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर मंडल आणि शेट्टी औंधमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तेव्हा पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या चौधरी यांना चोरट्यांनी मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रुग्णालयात दाखल झालेल्या शेट्टी यांना मिळाली. चौधरी यांनाही ओैंधमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आणखी वाचा-‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही,’ छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, अमोल झेंडे, चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरटे दुचाकी आणि रिक्षातून पसार झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. चित्रीकरण, तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून चोरट्यांचा माग काढण्यात आला. पसार झालेल्या चोरट्यासह अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपीला पोलीस कोठडी; अल्पवयीन साथीदारांची रवानगी सुधारगृहात

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी जय घेंगटला न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तीन अल्पवयीन मुलांना चौदा दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. नुकतीच त्याची बालसुधारगृहातून मुक्तता करण्यात आली होती.