Suresh Kalmadi Died in Pune: माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं मंगळवारी पहाटे निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. सुरेश कलमाडी यांच्या कार्यालयाच्या हवाल्याने एएनआयनं हे वृत्त दिलं आहे. सुरेश कलमाडी यांच्यावर गेल्या काही काळापासून दीर्घकालीन आजारामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेश कलमाडी यांनी आपल्या कार्यकाळात राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. याशिवाय ते प्रदीर्घ काळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून जात होते. शिवाय त्यांनी अल्पकाळ रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता.
‘पुण्याचे माजी खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (८१ वर्षे) यांचं पुण्यात आज निधन झालं. पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रदीर्घ आजारामुळे उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे’, अशी माहिती जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. सुरेश कलमाडी यांच्या निधनामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
सुरेश कलमाडी यांचं पार्थिव एरंडवणेतील त्यांचं निवासस्थान ‘कलमाडी हाऊस’मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून साडेतीनच्या सुमारास नवी पेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पायलट म्हणून सुरुवात…
पुण्याच्या राजकारणावर सुरेश कलमाडी यांनी एकेकाळी पूर्ण प्रभाव राखला होता. पण राजकारणात येण्याआधी सुरेश कलमाडी हे १९६४ ते १९७२ या काळात भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कार्यरत होते. १९७४ साली ते सेवेतून निवृत्त झाले आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाले. तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९५ ते १९९६ या काळात काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता.
२०१० साली दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेवेळी सुरेश कलमाडी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. एप्रिल २०११ साली त्यांच्यावर दोषसिद्धीही झाली. यानंतरदेखील क्रीडा क्षेत्रात, विशेषत: ऑलिम्पिकशी संबंधित संघटनेमध्ये सुरेश कलमाडी यांचा प्रभाव पाहायला मिळत होता. २०१६ साली सुरेश कलमाडी व अभय सिंह चौटाला यांना भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या पॅनलचे आजीवन अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, कलमाडी यांनी तेव्हा ही जबाबदारी नाकारली होती.
