भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीकृष्ण माधव भावे (७९) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार असून, भावे यांच्या अंतिम इच्छेनुसार देहदान करण्यात आले.
डॉ. भावे हे वाडिया महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. गणित आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली होती. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे ते काही काळ प्राचार्य होते. तसेच आयआयटी मुंबईमध्येही २००२ ते २००४ या कालावधीत त्यांनी अध्यापन केले होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव आणि अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषवली. अडचणीच्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळासाठी अव्याहत कार्य करून मंडळाला पुन्हा उभारी देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मंडळाचे शताब्दी वर्ष त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कार्यकाळात साजरे झाले. जवळपास ३० वर्षे त्यांनी विनामानधन मंडळासाठी काम केले. पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य, पुणे विद्यापीठ शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेशी ते दीर्घकाळ संलग्न होते.
गणित आणि तत्त्वज्ञान विषयातील त्यांनी लिहिलेले सुमारे २५ शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ‘नवभारत’ या नियतकालिकाचे ते संपादक होते. भावे यांनी ‘सरखेल कोलंबस’, ‘जीर्णोद्धार’, ‘थॉमस पेन’, ‘युजिन ग्रांड’ या पुस्तकांचे लेखन केले होते. तसेच, शेषराव मोरे यांच्या ‘काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ या ग्रंथाचा प्रतिवाद करणाऱ्या ग्रंथाचे संपादन डॉ. भावे यांनी केले.
अतिशय अडचणीच्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाची धुरा श्री. मा. भावे यांनी उत्तम पद्धतीने सांभाळली. इतिहासाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे.
– डॉ. गजानन मेहेंदळे, इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक
‘विचारवंत’ हा शब्द आपण सैलपणे वापरतो. तो ज्यांच्याबाबत ‘नेमका आणि समर्पक’ ठरावा असे श्री. मा. भावे गेले. गणितापासून ते इतिहासापर्यंत, विज्ञानापासून ते समाजशास्त्रापर्यंत अनेक विषयांत त्यांना गती होती. ठाम, पण अभिनिवेशशून्य मांडणी हे त्यांच्या वैचारिक लेखनाचे प्रमुख आणि आज दुर्मीळ ठरणारे वैशिष्टय़ होते. बुधवारीच सकाळी नरेंद्र चपळगावकर यांचा फोन आला होता. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे दिला जाणारा पुढच्या वर्षीचा श्री. ग. माजगावकर पुरस्कार श्री. मा. भावे यांना देण्याबाबत मी सुचवणार होतो. त्या निमित्ताने श्री. मा. भावे यांच्याबद्दल चपळगावकर यांच्याशी बोलणेही झाले होते. मात्र भावे यांच्या निधनाची बातमी कळाली आणि मन सुन्न झाले.
– दिलीप माजगावकर
इतिहास या विषयाकडे अतिशय जिव्हाळ्याने पाहाणाऱ्या अभ्यासकाला आपण मुकलो आहोत. ग. ह. खरे यांच्यानंतर इतिहास संशोधक मंडळाकडे तेवढय़ाच उत्तुंग आस्थेने पाहणारी ही व्यक्ती होती.
– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
