पुणे : ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीकांत शिवदे (वय ६४) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. अॅड. शिवदे गेल्या वर्षभरापासून कर्करोगावर उपचार घेत होते. बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  अॅड. शिवदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसाय सुरू केला. खासदार वंदना चव्हाण, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. विराज काकडे, अॅड. विजय सावंत आदी सहकाऱ्यांसमवेत त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अॅड. शिवदे फौजदारी खटल्यात निष्णात वकील म्हणून नावाजले होते. अभिनेता सलमान खान याच्याकडून मुंबईतील वांद्रे येथे अपघात (हिट अँड रन) झाला होता. या खटल्यात अॅड. शिवदे यांनी खान याची बाजू मांडली होती. हिरे व्यापारी, चित्रपट निर्माते भरत शहा यांच्या विरोधात गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. शहा यांच्याकडून अॅड. शिवदे यांनी काम पाहिले होते. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपातील खटल्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात लष्करी अधिकारी प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते.  बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर अॅड. शिवदे यांनी बाजू मांडली होती. अॅड. शिवदे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात शोककळा पसरली. पुणे बार असोसिएशनकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior lawyer shrikant shivade passes away ysh
First published on: 20-01-2022 at 00:48 IST