scorecardresearch

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) ते राष्ट्रीय कोशाध्यक्ष मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे (वय ८७) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) ते राष्ट्रीय कोशाध्यक्ष मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी. शेवाळे (वय ८७) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, चार मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

शेवाळे यांच्या पार्थिवावर बुधवारी (१७ मे) सकाळी अकरा वाजता धोबी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, नाना पेठेतील अहिल्या आश्रमाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अहिल्या आश्रम या संस्थांच्या माध्यमातून शेवाळे यांनी भरीव कार्य उभारले. रिपब्लिकन ऐक्यासाठी त्यांचा पुढाकार महत्वाचा राहिला होता. बी. ए. पदवी संपादन केलेल्या शेवाळे यांनी लष्करात काही काळ काम केले. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा. सु. गवई यांच्यासह रिपब्लिकन चळवळीच्या कार्याला सुरुवात केली. पुढे ते रामदास आठवले यांच्याबरोबर जोडले गेले.

अहिल्या आश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याची आणि ऐकण्याची संधी शेवाळे यांना मिळाली होती. त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली होती. मात्र, अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. १९९१ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील घराची पुनर्बांधणी करण्यात त्यांची मोलाची भूमिका बजावली. चळवळींना सक्षम करण्यासाठी, कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी विविध विषयांवर त्यांनी सातत्याने विपुल लेखन केले. त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने, तसेच दलितमित्र पुरस्काराने झाला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Senior leader ambedkari movement m d shewale passed away republican party of india amy

ताज्या बातम्या