बारामती : ‘दहशतवाद विरोधात जागतिक पटलावर देशाची भूमिका मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शिष्टमंडळावर दिलेल्या देशांमध्ये जाऊन भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका आणू नये,’ असे सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरोधातील भूमिका जागतिक पटलावर मांडून पाकिस्तानविरोधात राजनैतिक लढाई भक्कम करण्यासाठी तयार केलेल्या खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे विधान केले.
ते म्हणाले, ‘हा निर्णय पक्षीय नसतो. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना संयुक्त राष्ट्र संघामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ गेले होते. त्या शिष्टमंडळात सदस्य म्हणून मीदेखील होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न येतात, तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते. नरसिंहराव यांच्या काळामध्ये झाले, तेच आजही होत आहे.’
‘सरकारने तयार केलेल्या शिष्टमंडळांना दिलेल्या देशामध्ये जाऊन भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका मांडायची आहे. खासदार संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, एका शिष्टमंडळामध्ये त्यांच्या पक्षाची एक महिला सदस्यदेखील आहे. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका आणू नये,’ असे पवार म्हणाले.
‘विमानतळ प्रश्नावर बैठक घ्या’
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे आणि स्थानिक प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात यावी. या बैठकीमध्ये येथील बागायत क्षेत्र वाचवण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतात का, याबाबत आढावा घ्यावा,’ अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. ते म्हणाले, ‘पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फळबागा, ऊस आदी पिके फुलवली आहेत. काही शेतकऱ्यांनी माझी भेट घेऊन या समस्येमधून सुटका करण्याची विनंती केली. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारला निर्णय घ्यायचा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी बोलून निर्णय घेण्यात यावा.’