पुणे : मला आयुष्यात कितीतरी जास्त मिळाले. आता माझ्या तीनच इच्छा आहेत. पुनर्जन्म झाल्यास तीच आई, तीच पत्नी, तीच मुले, तेच शिक्षक हवे आहेत. तो खडतर प्रवास पुन्हा करायचा आहे. २०४७ मध्ये भारत कसा आहे हे पाहायचे आहे. मला घडवलेल्या, माझ्यावर प्रेम केलेल्या पुण्यातच मला अखेरचा श्वास घेता यावा, अशी भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
सह्याद्री प्रकाशनातर्फे ‘दुर्दम्य आशावादी : डॉ. रघुनाथ माशेलकर’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मनमोहन शर्मा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. माशेलकर बोलत होते. वैशाली माशेलकर, चरित्र ग्रंथाचे लेखक डॉ. सागर देशपांडे, स्मिता देशपांडे या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा – भारतरत्न प्राप्त पुणेकरांच्या कुटुंबीयांचा सत्कार
डॉ. मुजुमदार म्हणाले की, डॉ. माशेलकर म्हणजे चालते-बोलते ज्ञानपीठ आहे. त्यांच्या जीवनाचा सर्व अंगांनी वेध घेणे सोपे काम नाही. ते प्रत्येकासाठी ज्ञान देणारे, प्रेरणा देणारे आहेत. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, महिला केंद्रित कुटुंब व्यवस्था, मानव केंद्रित विकास, ज्ञान केंद्रित समाज आणि नावीन्यता केंद्रित देश ही त्यांनी सांगितलेली पंचशीले राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात असायला हवीत.
हेही वाचा – पुणे : ओशो आश्रमातून चंदनाची झाडे चोरीला
नव्या पिढीतील तरुण उद्योजकांसाठी डॉ. माशेलकर मार्गदर्शक आहेत. देशाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर डॉ. माशेलकर यांची भूमिका पटली. देशात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम डॉ. माशेलकरांनी केले. डॉ. माशेलकर यांचे चरित्र हा महत्त्वाचा दस्तावेज आहे, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. डॉ. शर्मा म्हणाले, की गेली ५८ वर्षे डॉ. माशेलकर यांच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. सहकारी आभाळाइतका मोठा झाल्याचा आनंद आहे. डॉ. माशेलकर यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व दुर्मीळ आहे. त्यांनी सीएसआयआरमध्ये असे काम केले आहे की, काही अडचण आल्यास पंतप्रधान सीएसआयआर आणि डॉ. माशेलकर यांच्याकडे यायचे. तळागाळात होत असलेल्या नवसंशोधनासाठी डॉ. माशेलकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पुस्तकासाठी डॉ. माशेलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना समोर आलेली रंजक माहिती डॉ. देशपांडे यांंनी सांगितली.