पुणे : एकीकडे खगोलविज्ञानासारख्या किचकट विषयामध्ये पथदर्शी संशोधन करतानाच आपल्या सहजसोप्या लेखनातून सर्वसामान्यांना विज्ञानाची गोडी लावणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. परदेशात वास्तव्यास असलेली मुलगी आल्यानंतर आज, बुधवारी डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
‘आकाशाशी जडले नाते’ या माहितीग्रंथातून संपूर्ण खगोलविज्ञान अत्यंत सोप्या भाषेत मराठीतून मांडण्याची किमया डॉ. नारळीकर यांनी केली. या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळालीच, पण त्याने अंतराळात घडणाऱ्या घडामोडी मराठी वाचकांच्या घराघरात पोहोचल्या. अनेक विज्ञान कादंबऱ्या आणि कथांच्या माध्यमातून आबालवृद्धांमध्ये त्यांनी विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण केले. विज्ञान केंद्रस्थानी ठेवून कथा-कादंबऱ्यांची रचना करताना विज्ञानाच्या कोणत्याही सिद्धांताला धक्का लागणार नाही, याची काळजी त्यांनी सतत घेतली. त्यामुळेच त्यांच्या या साहित्याचे जितके स्वागत (पान १० वर) (पान १ वरून) वाचकांकडून झाले, तितकेच ते वैज्ञानिक वर्तुळातही स्वीकारले गेले. ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मकथनपर पुस्तकामध्ये त्यांनी चार शहरांतील अनुभवांवर आधारित केलेल्या लेखनाला वाङ्मयीन पुरस्कार मिळाले होते. ‘विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाने डॉ. विजया वाड यांनी नारळीकर यांचे चरित्र लिहिले आहे. ‘केम्ब्रिज विद्यापीठा’त असताना ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉएल यांच्या जोडीने ‘बिग बँग थिअरी’ला आव्हान देणारे संशोधन त्यांनी केले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ढासळली होती. दोन आठवड्यांपूर्वी पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली झाल्याने शस्त्रक्रीया करावी लागल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.