scorecardresearch

ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे निधन

विषाणू विज्ञान, लसीकरण आणि साथरोग या विषयांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ अशी डॉ. बॅनर्जी यांची ख्याती होती.

ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे निधन
(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी  यांचे करोना संसर्गाने गुरुवारी निधन झाले.  ते ८३ वर्षांचे होते. विषाणू विज्ञान, लसीकरण आणि साथरोग या विषयांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ अशी डॉ. बॅनर्जी यांची ख्याती होती.

१९८८ ते १९९७ या काळात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या मागे पत्नी, चित्रपट अभ्यासक हेमंती बॅनर्जी आणि अनेक विद्यार्थी, संशोधक असा परिवार आहे.

डॉ. बॅनर्जी मूळचे कोलकाता येथील होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून १९६१ मध्ये एमबीबीएस आणि १९६८ मध्ये पी. एचडी. पूर्ण के ले. १९७३ पासून ते राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कार्यरत होते.

जागतिक आरोग्य संघटनेसारख्या अनेक महत्त्वाच्या संघटनांच्या वैज्ञानिक सल्लागार गटांमध्ये त्यांचा समावेश होता. भारतातील अनेक वैज्ञाानिक पुरस्कारांचे ते मानकरी होते. तुलसी रामायण आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांचा व्यासंग होता.

मोलाचे संशोधनकार्य

विषाणूंचा उगम आणि प्रसार हा डॉ. बॅनर्जी यांच्या अभ्यासाचा भाग होता. डास गटातील डेंग्यू विषाणूचे जनुकीय मार्क र सर्वप्रथमबॅनर्जी यांनी निश्चित के ले. टिश्यू कल्चर प्रकारात कायसनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) वरील लस सर्वप्रथम त्यांनी तयार केली. डेंग्यू, केएफडी आणि चिकुनगुनिया तसेच जपानी एन्सेफलायटीस विषाणू महामारीचा त्यांचा समग्र अभ्यास होता. पश्चिम भारतातील एचआयव्ही विषाणू संसर्गाच्या प्रसाराचा सखोल अभ्यासही डॉ. बॅनर्जी यांनी केला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-04-2021 at 00:50 IST