पुणे : फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पाषाण रस्त्यावरील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी सायंकाळी घडली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला.
आशा विजयकुमार पाटील (वय ७३, रा. अभिमानश्री हाऊसिंग सोसायटी, पाषाण रस्ता ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत अतुल विजयकुमार पाटील (वय ५२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील दररोज सायंकाळी घरातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायच्या. शनिवारी (२४ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या पाषाण रस्त्यावरुन निघाल्या होत्या. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने पाटील यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपचारांपूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक धस तपास करत आहेत.
सोलापूर रस्त्यावर पादचारी तरुणाचा मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यमुुखी पडलेल्या पादचारी तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २३ जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास थेऊर फाटा परिसरात अपघात झाला. ३५ वर्षीय तरुण सोलापूर रस्त्यावरुन निघाला होता. तरुणाला धडक देऊन वाहनचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत
ट्रकवर मोटार आदळून एकाचा मृत्यू
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळून मोटारीतील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भीमा राजेंद्र जाधव (रा. धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत मोटारचालक शुभम सुनील डुबळे (वय २७, रा. पूर्वा हाईट्स, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे दिवे घाट परिसरातील श्री कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ते बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू ठेवले नव्हते. रस्त्यात अंधारात थांबलेला ट्रक मोटारचालक शुभम याला दिसला नाही. ट्रकवर माेटार आदळून मोटारचालक शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भीमा याचा मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करत आहेत.
